Monday, March 23, 2020

शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ।।


वेदांमध्ये ॐकार आहे तोही त्याचे रुप आहे. ही त्याची रुपे आपण अनुभवायची आहेत. या अनुभवातून आपल्यातील मीपण नष्ट होऊन आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. तपस्वींच्या ठिकाणी असणारे तप आहे ते सुद्धा त्याचेच रुप आहे. यातूनच आता आपले अस्तित्व हे निमित्तमात्र आहे याचा बोध होईल.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

म्हणौनि उदकी रसु । कां पवनीं जो स्पर्शु ।
शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ।। 33 ।। अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ - म्हणून पाण्यामध्यें रस किंवा वाऱ्यामध्यें स्पर्श अथवा चंद्रसूर्यांमध्ये जें तेज आहे तें मीच आहे, असें समज.

मानवाच्या शरीरात तो आत्म्याच्या स्वरुपात आहे. पण सृष्टीमध्येही त्याचे अस्तित्व आहे. अन्य सजिव वस्तुमध्येही तो आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये जो जीवंतपणा आहे, तो त्याच्यामुळेच आहे. शाश्‍वत म्हणून जे काही आहे त्यात तो आहे. पाण्यामध्ये रस आणि वाऱ्यामध्ये स्पर्श यांच्या रुपात तो आहे. चंद्र आणि सूर्यामध्ये तो तेज, प्रकाशाच्या रुपात आहे. ही त्याची ओळख आपण करून घ्यायची आहे. ती अनुभवायची आहे. त्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. सजिवाच्या जगण्याचे जे कारण आहे, ते त्याचे स्वरुप आहे. जगात जो जन्माला आला त्याला मरण हे आहे. पण आत्मा अमर आहे. याचा अर्थ सजिवांमध्ये असणारा तो अमर आहे. त्याला जन्म नाही ना मरण. याचाच अर्थ आपले अस्तित्व हे फक्त निमित्तमात्र आहे. आपण आपले खरे स्वरुप येथे जाणून घ्यायचे आहे. हे खरे स्वरुप आपणाला जेव्हा होईल तेव्हा आपल्यातील मीपणा, अहंभाव हा नष्ट होईल आणि तेव्हाच त्याचे खरे स्वरुप आपणास समजू शकेल. व्यक्तीशा आपण त्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. प्रत्येक सजिवातील त्याचे अस्तित्व अनुभवायचे आहे. ही अनुभुती जेव्हा आपणास येईल, तेव्हा आपल्या खऱ्या स्वरुपाचा बोध आपणास होईल. आपणामध्ये जो आहे तोच या चराचरामध्ये सामावलेला आहे. याचा बोध होईल. म्हणजेच सृष्टीमध्ये जे घडते ते त्याच्याच मुळे घडते. ते त्याचेच रुप आहे. याचा बोध होईल. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये मुख्य अडथळा हा मीपणाचा, अहंभावाचा आहे. तो जेव्हा जाईल तेव्हा आत्मज्ञानाचा खरा मार्ग सुकर होईल. यासाठी त्याच्या अस्तित्वाचा बोध होणे हे गरजेचे आहे. तोच स्वतःमध्ये आहे हेही अनुभवने गरजेचे आहे. पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास हे त्याचेच रुप आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारे शब्द आहेत, ते ही त्याचे रुप आहे. वेदांमध्ये ॐकार आहे तोही त्याचे रुप आहे. ही त्याची रुपे आपण अनुभवायची आहेत. या अनुभवातून आपल्यातील मीपण नष्ट होऊन आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. तपस्वींच्या ठिकाणी असणारे तप आहे ते सुद्धा त्याचेच रुप आहे. यातूनच आता आपले अस्तित्व हे निमित्तमात्र आहे याचा बोध होईल. यासाठीच आपण आपले खरे कार्य ओळखून, आपल्या जन्माचा उद्देश ओळखून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानी होणे, ब्रह्मसंपन्न होणे हेच आपले ध्येय आहे. तेव्हांच आपणाला ते स्वामित्व प्राप्त होईल. तेव्हाच आपणास आपल्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment