Tuesday, March 31, 2020

तुवा होआवें योगयुक्ता ।


मन साधनेत रमवायचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानावर लक्ष देऊन योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे केले तर आपण जरूर योगसंपन्न होऊ शकू.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल 8237857621

या कारणे पंडूसुता । तुवा होआवें योगयुक्ता ।
येतुलेनि सर्वकाली साम्यता । आपणपां होईल ।। 256 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना म्हणून तु योगसंपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्वकाळ स्वरुप साम्यता होईल.

साधना आपण करत राहायचे आहे. प्रयत्न सुरु ठेवायचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहायचे आहे. साधनेतून काय मिळते याची इच्छा न ठेवता सो ऽ हम साधना सुरू ठेवायची आहे. साधनेत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते एकाग्र होईल किंवा होणारही नाही. म्हणून साधना सोडून द्यायची नाही. सो ऽ हम वर मन लक्ष केंद्रीत करायचे आहे. नजर केंद्रीत करायची आहे. लक्ष केंद्रीत करायचे आहे. साधनेत नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्‍वासातून सो ऽ हमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकायचा आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. ध्यानाच्या काळात मनात येणारे सर्व विचार दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विचार येतच राहणार. ते थांबवता येणार नाहीत. यासाठी जास्तीत जास्त सोऽहमवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे येणाऱ्या विचारापासून आपण निश्‍चितच दूर जाऊ. विचार दाबायचा प्रयत्न केल्यास ते पुन्हा येणार पण मनच त्या विचारापासून दूर नेले तर मात्र निश्‍चितच ते दूर जातील. यासाठी मन साधनेत रमवायचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानावर लक्ष देऊन योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे केले तर आपण जरूर योगसंपन्न होऊ शकू. साधनेतून आपल्या स्वरुपाची ओळख करून घ्यायची आहे. मी कोण आहे याचा बोध करून घ्यायचा आहे. आपले खरे स्वरुप जाणून घ्यायचे आहे. याचा बोध, अनुभुती जेव्हा होईल तेव्हा आपले मन सोऽहम स्वरावर निश्‍चितच केंद्रीत होईल. दोन्ही नाकपुड्यातून एकाच वेळी श्‍वास आत घेता येईल व एकाचवेळी तो बाहेर सोडता येईल. ही साम्यावस्था आपणास सहज साध्य होईल. योगामुळे ते आपोआप आपणास घडेल. यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. सोऽहमचा बोध होईल. स्वतःच्या स्वरुपाची अनुभुती येईल. आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. हेच तर या योगातून साधता येईल. ते सहज आहे यासाठी आपण फक्त योगसंपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आहे. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment