Friday, November 1, 2019

लोभी वृत्ती


लोभी वृत्तीविरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

जैसी मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडीं ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ।। 147।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें माशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच, धीवर गळास हिसका देतो.

लोभी आणि स्वार्थी असतो. अशा या त्याच्या स्वभावामुळेच तो अनेक संकटांत सापडतो. जगात वावरताना लोभ, माया, स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय हवी. लोभाच्या लालसेने आपण स्वतःच स्वतःसमोर अनेक संकटे उभी करत असतो. अनेक शेतकरी अधिक उत्पन्नाच्या लालसेपोटी पिकांना प्रमाणापेक्षा अधिक खते टाकतात. ठराविक मर्यादेपर्यंत पिके खतांचे शोषण करू शकतात. कोणत्या पिकास किती प्रमाणात खते द्यायला हवीत, त्याची आवश्‍यकता किती आहे, हे संशोधकांनी शोधले आहे. त्या प्रमाणातच खतांचा पुरवठा करणे योग्य असते. अधिक उत्पन्नाच्या लालसेने खतांची मात्रा वाढवून शेतकरी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतो. यासाठी कोणतीही गोष्ट ठराविक एखाद्या मर्यादेपर्यंत उत्तम प्रतिसाद देते. हाव असावी, पण त्याला ठराविक मर्यादा असावी लागते. खाद्याच्या आमिषाने मासा जळपारध्याच्या जाळ्यात सापडतो. सध्या समाजात अशा अनेक जळपारध्यांचा सुळसुळाट झालाय. व्यापाऱ्यांच्याही वृत्तीत मोठा बदल झाला आहे. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम सत्तेत असणाऱ्या राज्यकर्त्यांनी लोभ सोडायला हवा. लुटारू वृत्ती सोडायला हवी. जसा राजा तशी प्रजा, असे म्हटले जाते. भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या सान्निध्यात भ्रष्ट लोकांचा वावरच अधिक असतो. अशा वृत्तीमुळे भ्रष्ट कारभारात वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बदलत चालली आहे. ही जनता कधी तरी या विरोधात उठाव करणार, हे निश्‍चित. जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला, तर जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभी वृत्तीविरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते, असे लक्षात येईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

No comments:

Post a Comment