Saturday, November 30, 2019

गुरू - शिष्य ऐक्‍य


पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सुक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तीच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।। 454 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - जसे दोन ओठ पण बोलणें एक, पाय दोन पण चालणें एक, त्याप्रमाणें, तू विचारणारा व मी सांगणारा, ह्या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे.

बदलत्या काळानुसार गुरू आणि शिष्य या नात्यातही मोठा बदल होत आहे. पूर्वीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना हातात छडी घेऊन शिकवत होते. विद्यार्थीही त्यांचा मार खात असे, पण त्यांनी मार का दिला याचा विचार करून त्याच्या मनामध्येही बदल होत असे. तो सकारात्मक बदल असे. काही विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्या शिक्षकांनी असा मार दिला, त्यामुळे ते इतके मोठे होऊ शकले, त्यातून अनेक बोध घेऊ शकले, असे सांगतात. हे अनुभव ऐकताना नव्या पिढीला खूपच आश्‍चर्य वाटते. आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत असे, इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता. असे गुरू नव्या पिढीत पहायला मिळत नाहीत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे तसे गुरू-शिष्य या नातेसंबंधातही मोठा बदल होत आहे. पाश्‍चिमात्य गुरूंमध्ये त्याग, आत्मियता, जिव्हाळा, तळमळ पहायला मिळत नाही. हीच संस्कृती सध्या नव्या पिढीत जोपासली जात आहे. नाती आता पैशाने मोजली जात आहेत. सध्या पदव्याही विकत मिळतात. शिक्षणासाठीचे वाढते शुल्क विचारात घेता त्यानुसारच शिक्षण मिळत आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. त्यानुसार तसे विचारप्रवाहही बदलत आहेत. शिक्षणाच्या या व्यापारामुळे गुरू-शिष्य संबंधालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाच्या तुलनेत शिक्षण दिले जात आहे. अशा शिक्षण संस्थांत त्याग, पूज्यता, गुरूंचा सन्मान या गोष्टी कशा काय शिल्लक राहतील ? वर्गात किती तास शिकवले यावरच त्यांची पात्रता ठरवली जाते. त्यावरच त्यांना पगार मिळतो. शिष्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी तीही पैशाच्या तुलनेत मोजली जाते. अशा या नव्या पिढीला त्यागी गुरू कसे मिळतील? पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सुक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तीच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत. हे आता नव्या पिढीत दिसत नसले तरी नव्या पिढीत हे होई शकते. तो संस्कार या पिढीत आणला जाऊ शकतो. गुरूच्या पावलावर शिष्याने पाऊल टाकायला हवे. त्यांच्या दोघामध्ये तसे ऐक्य निर्माण व्हायला हवे. अध्यात्मातील ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळेच तो विचार आजही टिकून आहे. गुरुच्या संस्काराने शिष्य तयार होतो. तसा तो विचार पुढच्या पिढीत देत राहातो. यामुळे ही परंपरा आज अमर झाली आहे. अमरत्वाला पोहोचली आहे. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment