Saturday, November 9, 2019

तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ।।


ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात. प्रत्येक पारायणावेळी येणारी अनुभुती ही नित्य नुतच अशीच आहे. म्हणूनच त्या ग्रंथाची पारायणे सुरू आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहतील. भाषेत बदल होईल पण त्यातील विचार मात्र तोच राहील. तो विचार नित्य नव्या रूपात पाहायला मिळेल. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । 
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ।। ७१ ।। अध्याय १ ला

ओवीचा अर्थ - त्यावर शंकर म्हणाले, हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही, त्याप्रमाणे गीतातत्वाचा विचार करावयास जावे तेंव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते.                                                                                                                                                                                                                                         
गीतेमध्ये मांडण्यात आलेला विचार हा वैश्विक आहे. मानवी जीवनाचा अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे. यामुळेच कोणत्याही युगात मानवासाठी हा उपयोगी ठरणारा असा विचार आहे. युगानुयुगे मार्गदर्शक ठरणारा असा हा विचार आहे. कित्येक वर्षे लोटली तरी तो विचार आजही प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. कारण तो नित्य नुतन आहे. प्रत्येकवेळी त्यातून येणारा बोध, येणारी अनुभूती ही नित्य नुतन अशीच आहे.  यामुळेच तिला अमरत्व प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानेश्वरी ही गीतेवर आधारित आहे. गीतेतील सातशे श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलीने केलेले भाष्य आहे. निरूपण आहे. सर्वसामान्य माणसाला गीतेचा अर्थ समजावा यासाठी केलेली ही निर्मिती आहे. गीतेतील अमरत्वाचा विचारही श्री ज्ञानेश्वरीमध्ये उतरला आहे. यामुळे ज्ञानेश्वरीलाही अमरत्व प्राप्त झाले आहे. गीतेप्रमाणे ज्ञानेश्वरी येणारा विचार, अनुभूती, बोध हा नित्य नुतनच आहे. ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात. प्रत्येक पारायणावेळी येणारी अनुभुती ही नित्य नुतच अशीच आहे. म्हणूनच त्या ग्रंथाची पारायणे सुरू आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहतील. भाषेत बदल होईल पण त्यातील विचार मात्र तोच राहील. तो विचार नित्य नव्या रूपात पाहायला मिळेल. नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी तीच आहे. पण त्यातून येणारा बोध, अनुभूती ही नित्य नुतन असल्याने ज्ञानेश्वरीही आवडीने वाचली जाते. पारायणावेळी येणारी ओवी प्रत्येकवेळी तीच आहे. पण त्यातून येणारी अनुभूती दरवेळी वेगळी आहे. दररोज येणारे वृत्तपत्र तेच आहे. मात्र रोज त्यामध्ये येणाऱ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. दररोज त्यामध्ये नवेपणा आणावा लागतो तरच ते खपले जाते. अन्यथा ते बंद पडू शकते. दरवर्षी येणारे दिपावली, दसरा, होळी असे सण तेच असतात. पण या प्रत्येक सणाला वृत्तपत्रात येणारी बातमी, लेख नव्या रूपात द्यावा लागतो. त्यामध्ये नवेपण आणावे लागते. तरच वाचक तो अंक घेईल. दरवर्षी तोच तोच पणा आला तर अंक वाचला कसा जाणार. यासाठी त्यात वेगळेपण हे आणावे लागते. हे वेगळेपण कृत्रिम आहे. पण ज्ञानेश्वरी पारायणाच्या सणात येणारा नवा विचार हा नैसर्गिक आहे. येथे वेगळेपण हे ओघाने येत असते. ते नवेपण आणावे लागत नाही. आपोआप विचार प्रकट होतात.  नैसर्गिकपणा असल्यानेच ते मनाला भावते. मन त्यामध्ये रमते.  सद्गुरूंच्या आशिर्वादाने हे नवेपण येत असते. सद्गुरू हे शिष्याला दरवेळी असे नित्य नुतन अनुभव देत असतात. या नवेपणामुळेच शिष्याला प्रेरणा मिळते. स्फुरण चढते. यातूनच त्यांचा अध्यात्मिक विकास होतो. अशा या गीतातत्वामुळेच त्यालाही त्या अमर तत्वाचा बोध होतो व अमरत्व प्राप्त होते.

No comments:

Post a Comment