Thursday, November 21, 2019

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।


दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी.

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।। 22 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्नें होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असलें तर जीव घ्यावयास आलेलाहि प्रेम करतो.

दैव जर अनुकूल झाले, तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल, तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो इतके सामर्थ या दैवात आहे; पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो; पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, पण त्सुनामीसारखी एखादी लाट क्षणात सारे उद्‌ध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जीर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कृपा कशी होईल, हे सांगता येत नाही. एखाद्या चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही काहीच भेटत नाही, असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्‌गुरूंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते नाही तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच, सद्‌गुरूंच्या आशीर्वादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे, पण हे लिहून घेणारा कोणी तरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले, हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही. मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. मनात येणारे विचारही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. तो सोहम्‌ चा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचारलहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचारलहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

No comments:

Post a Comment