Tuesday, November 26, 2019

शुन्यातून विश्वनिर्माण करणारा नवनाथ - यशोगाथा






नवनाथ दत्तात्रय कवडे माझा शालेय मित्र. रुकडी ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)  येथे प्राथमिक शाळेपासून ज्युनिअर महाविद्यालयातही तो माझ्या बरोबर होता.  रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, महाविद्यालयात आमचे शिक्षण झाले. नवनाथ मुळचा आंदोरा ( ता. कळंब, जि. उस्मानाबाद) गावचा. कळंबपासून अवघ्या पाच किलोमीटरवर त्याचे गाव. १९७० चा त्याचा जन्म. पण १९७१ - ७२ च्या दुष्काळामुळे कुटुंबाची अवस्था खूपच बिकट झाली. मुळात गरीबीने  त्रस्त असणाऱ्या कुटूंबात जन्म अन् त्यातच दुष्काळाची झळ त्यामुळे आणखीनच बिकट समस्या त्याच्या कुटूंबासमोर होती. अशा परिस्थितीमुळे नवनाथच्या वडीलांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला ते काम शोधण्यासाठी नागपूरला गेले. नवनाथ व त्याचा लहान भाऊ हे ही त्याच्यासोबत होते. सहा महिने ते नागपूरमध्ये होते. त्याच दरम्यान नवनाथचा लहान भाऊ आजारी पडला. औषधालाही पैसे नव्हते.  त्यामुळे आजारपणातच त्याचा मृत्यू झाला.  या घटनेने व्यथीत झालेल्या नवनाथच्या वडीलांना पुन्हा गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.

गावात पुन्हा काम शोधायला सुरवात केली. पण मनासारखे काम त्यांना मिळत नव्हते. म्हणावा तसा पैसाही मिळत नव्हता. त्यामुळे ते व्यथीत होते. पुन्हा गावाबाहेर पडून काम शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पूर्वेकडे उन्हाचा ताप जास्त असतो. कष्टाच्या कामात थकवा अधिक येतो. आजारपणही येते. यासाठी त्यांनी पावसाच्या पट्ट्यात म्हणजे पश्चिमेकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाबाहेर पडण्यासाठी नवनाथच्या वडीलांनी आईला खूप विनवणी केली. पण एक मुलगा गमावून बसलेली ती माता आता गाव सोडण्यासाठी तयार नव्हती. नवनाथच्या वडीलांचा निर्णय मात्र पक्का होता. एकेदिवशी रात्री ते उठले. कोणालाही न सांगता ते गावाबाहेर पडले. खिशात काही पैसे नव्हते. त्यांच्या हातावर फक्त एक घड्याळ होते. ते द्यायचे अन् योग्य ठिकाण गाठायचे असे त्यांनी ठरवलं होतं. नवनाथचे वडील महामार्गावर आले. कोठे जायचे हेही काही निश्चित नव्हते. कारण कोणी नातेवाईक, पाहूणे पैही नव्हते. ज्यांच्याकडे जाऊन काही काम धंदा करून पैसा कमवता येईल. कोठे तरी जायचे हे निश्चित होते. पण ठिकाण निश्चित नव्हते. रस्त्याला कोणती गाडी प्रथम येईल त्या दिशेला जायचे असे त्यांनी ठरवले होते.  बीड - परळी ते कोल्हापूरकडे जाणारी गाडी प्रथम आली.  या गाडीतून ते कराडला पोहोचले.



कराडमध्ये त्यांनी काही दिवस बिगारी काम केले.  पुणे - बंगळूर महामार्गाचे काम त्याच कालावधीत सुरू होते. १९७४ साल असेल. कराड ते सातारा या रस्त्या दरमानच्या कामासाठी प्रयत्न केला. ओळख काढून त्यांनी काम मिळवले. या रस्त्याचे काम  गडोख कंपनी यांच्याकडे होते. काम करत असताना त्या ठेकेदाराच्या लक्षात आले की या व्यक्तीला काही लिहायला, वाचायला, हिशेब करायला येतो. कारण ७४ - ७५ च्या काळात शिकलेला माणूस मिळणे कठीण होते. त्यामुळे त्या ठेकेदाराने त्यांना हजेरी लिहिणे, कामगार सांभाळणे असे काम दिले. हजेरीतही वाढ केली.  पुढे काम उत्तमप्रकारे जमत असल्याने त्यांना मुकादम केले.  जवळपास १०० लोक त्याच्याहाताखाली कामास होते.  पैसाही चांगला मिळत होता. अवघ्या दोन वर्षात नवनाथच्या वडीलांनी शुन्यातून बरेच काही कमावले. 

पण त्याच दरम्यान १९७५ साली नवनाथची आई वारली. नवनाथ व त्याची छोटी बहीण उघड्यावर पडले. त्याकाळात ना फोन होता. ना संपर्काचे कोणते साधन होते. पटकण निरोप जाईल असे काहीच नव्हते. गावाकडे आपली बायको वारली आहे हा निरोपही त्यांना मिळाला नव्हता. कारण निरोप देणारे असे कोणीच नव्हते. मुळात नवनाथचे वडील आहेत कोठे हेच माहीत नसल्याने निरोप देणार तरी कसा हा मोठा प्रश्न होता. नशीबाने गावाकडच्या एका माणसाशी नवनाथच्या वडीलांची भेट झाली. त्यांनी त्यांना सांगितले की तुमची मंडळी देवाघरी गेली आहे. तुमची मुले उघड्यावर पडली आहेत. त्यांना सांभाळायला कोणीच नाही. वाट्टेल तिथे ती हिंडत आहेत. आजी होती पण ती तरी कसा सांभाळ करणार हाही प्रश्न होता. जवळपास पाच महिन्यांनी हा निरोप त्यांना मिळाला.  मुलांना घेऊन येतो असे सांगून त्यांनी ठेकेदाराकडून सुट्टी घेतली. सात दिवसात परत येण्याचे निश्चित झाले होते. कारण काम जबाबदारीचे असल्याने सुट्टी जास्त दिवस मिळणे कठीण होते.

गावाकडे जाताना त्यांच्या डोक्यात एवढाच विचार होता की मुलांना घ्यायचे. त्यांना एकदोन नवीन ड्रेस घालायचे. आणि कामावर परतायचे. अशा विचारातच नवनाथच्या वडीलांनी गाव गाठले. पण गावाकडे आल्यानंतर चित्र वेगळेच होते. मुलांना कुणीच सांभाळायला नसल्याने त्यांची फारच बिकट परिस्थिती झाली होती.  ना आंघोळ ना दोन वेळचे पोटभर जेवण. अशाने मुलांचे आरोग्य बिघडले होते. माती चिखलामुळे मुलांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. डोक्यात, अंगावर खरूज उटले होते.  ही अवस्था पाहून वडीलांना फारच काळजी वाटू लागली. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी कळंबला नेले तेथे दोनचार दिवस औषधोपचार केले. पण हा आजार काही इतक्यात बरा होणार नव्हता.  दोन दिवस झाले. चार दिवस झाले. असे करत आठवडा उलटला तरी या जखमा काही बऱ्या होत नव्हत्या. यातच महिना उलटला. वडील गावाकडेच होते. त्यामुळे सात दिवसात येणारा माणूस महिना उलटला तरी परतला नसल्याने मालकाने त्यांचा विषयच संपवला.

एक दीड महिन्यानंतर जेव्हा नवनाथ व त्याच्या बहिणीला घेऊन वडील कराडला परतले. तेव्हा येथील चित्र वेगळेच होते. मालक कामावर पुन्हा घ्यायला तयार नव्हता. कामामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मालक आणि कामगार यांच्यातील विश्वास उडाला की संबंध राहात नाहीत. तसेच झाले. मालकाचे काम अतितमध्ये सुरू होते पण त्याने पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला. शेवटी नवनाथच्या वडीलांनी अतितमध्येच बिगारी काम शोधले. कधी लाकडाच्या वखारीत, मिलमध्ये काम केले. कधी दगडे फोडायचे काम केले. पण एकदोन दिवस झाल्यानंतर काम संपले. अतित तसे छोटेशे गाव तेथे कायम स्वरूपी रोजगार मिळणे कठीणच होते. यासाठी मोठ्या शहराच्या ठिकाणी जाणे नवनाथच्या वडीलांना गरजेचे वाटले. यासाठी त्यांनी  सातारा गाठले.

पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्याजवळ एक मदिर होते. त्या मंदिरात त्यांनी दोन मुलांना ठेवले व साताऱ्यात कामाचा शोध सुरू केला. शहरात आल्याने काम मिळाले. पण आई नसल्याने मुलांचा सांभाळ कसा करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. राहात असलेल्या ठिकणच्या लोकांनीही मुलाच्या बाबत तक्रारी केल्या. एका सरकारी नोकरी करणाऱ्या माणसाने नवनाथच्या वडीलांना सांगितले की मुलांना रिमांडहोममध्ये घाला. साताऱ्यात रिमांडहोम होते.  तेथे नवनाथ आणि त्याच्या बहीणीला दाखल करण्यासाठी गेले. पण रिमांड होमच्या प्रमुखांनी मुलांना घेण्यास नकार दिला. कारण तेथे वडील नसलेल्या मुलांना घेण्यात येत होते. तसेच अनाथ व अल्पवयीन गुन्हेगारांना सांभाळले जात होते. वडील असलेल्या मुलांना प्रवेश दिला जात नव्हता. कारण वडील मुलांना रिमांड होममध्ये दाखल करून दुसरे लग्न करून नवा संसार थाटण्याचा धोका असतो. यासाठी त्यांना प्रवेश नाकारला. शेवटी नवनाथच्या वडीलांनी दुसरे लग्न करणार नाही, मुलांना सोडून कोठे जाणार नाही, आठवड्याला मुलांना पाहायला येईन असा बाँड लिहून दिला. त्यानंतर नवनाथ व त्याच्या बहिणीला रिमांड होमममध्ये प्रवेश मिळाला.


काही दिवसानंतर नवनाथला शिक्षणासाठी रूकडी येथील वसतीगृहात पाठवण्यात आले.  तर त्याच्या बहिणीला सांगलीतील हरिपूर जवळील एका वसतीगृहात पाठवले. नवनाथ तिसरीत असताना रूकडीत आला. तिसरी ते बारावी पर्यंत नवनाथ रूकडीत शिकला. तेथे त्याची चांगली जडणघडण झाली. पण बारावीनंतर पुढे काय हा प्रश्नच होता. सरकारी नियमानुसार बारावीपर्यंत मोफत शिक्षण होते. पुढे काय ? कारण नवनाथचे वडील सुद्धा कामगार होते. सातारा एमआयडीसीमध्ये ते काम करत होते. कसेबसे स्वतःचे आयुष्य ते जगत होते. नवनाथला मात्र आता वसतीगृह सोडणे भाग होते. शेवटी नवनाथने एका पत्र्याच्या पेटीत त्याचे साहित्य ठेवले व डोक्यावर पेटी घेऊन वडील राहात असलेले सातारचे ठिकाण गाठले.

नवनाथचे वडील एमआयडीसीत क्रशरवर काम करायचे. नवनाथला आता काम शोधायचे होते. पण काम कुठे शोधायचे हा प्रश्न होता. अखेर वडील नवनाथला म्हणाले, मी क्रशरवर दगडे फोडायचे काम करतो. तेथेच काम सुरू कर. आता नवनाथला या कामाशिवाय पर्याय नव्हता. दिवसा दगडे फोडायचे काम करायचे अन् जेवनही स्वतः शिजवायचे. असा त्यांचा दिनक्रम सुरू होता.  जवळपास चार-पाच महिने हे काम नवनाथने केले.  त्यानंतर थोडे हलके म्हणून सिमेंटच्या पाईप तयार करण्याच्या फॅक्टरीतही त्याने पाच-सहा महिने काम केले. काम करत असताना बाजारही त्यालाच करावा लागायचा तसेच जेवनही त्यालाच करावे लागायचे.

एके दिवशी बाजार करून आल्यानंतर बांधलेल्या पुड्या सोडून त्या डब्यात भरण्याचे काम नवनाथ करत होता. त्यावेळी त्याची नजर पेपरमधील जाहिरातीवर गेली. बारावी पास शिकाऊ मुले पाहिजेत. पगार ४५० रुपये. अशी ती जाहिरात होती. ती जाहिरात पाहून नवनाथने त्या पत्त्यावर जाण्याचा विचार केला. जाहिरात येऊन महिना झाला असावा. काहीही असो पण नवनाथने त्या पत्त्यावर जाण्याचा विचार केला. कामावरून आल्यानंतर नवनाथने तो पत्ता शोधत शोधत त्या कंपनीत गेला. तेथे गेल्यानंतर मालक म्हणाला, अरे जाहीरात कधीची आहे. तु आत्ता आला आहेस काय उपयोग ? आला आहेस ते आहेस पण अर्ज सुद्धा तू सोबत आणला नाहीस. नोकरी मागायला आला आहेस की बागेत फिरायला आला आहेस. अशा प्रकारे त्या मालकांने नवनाथचा समाचार घेतला. हे ऐकूण तेथे कोण थांबणार. नवनाथ हताश होऊन तेथून बाहेर पडत होता. गेटपर्यंत गेला असेल तेवढ्यात मालकाने त्याला पुन्हा हाक मारली. थांब म्हणाले. पुन्हा त्यांनी नवानाथची चौकशी सुरू केली. कुठून आला आहेस. तुझे शिक्षण किती झाले आहे असे विचारले. यावर नवानाथ म्हणाला, देगाव फाट्यावरून आलोय. बारावी पास आहे.

त्यावर मालक म्हणाले इथे राहतोस मग गाव कुठले?
नवनाथ म्हणाला, गाव उस्मानाबाद
शाळेला उस्मानाबादला होतास मग इकडे कशाला आलास
नवनाथ म्हणाला, गाव उस्मानाबाद आहे. पण शाळेला मी रूकडीला होता.
यावर त्या मालकाला थोडी उत्सुकता वाटली. त्यांनी नवनाथला बसायला स्टुल दिले. व म्हणाले तु मुळचा उस्मानाबादचा, शाळा शिकलास कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडीत आणि आता राहायला साताऱ्यात. नक्की तू आहेस तरी कुठला. यावर त्यांनी उत्सुकतेने नवनाथची सर्व चौकशी केली.  त्यांना सहानभूती वाटली व त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून कामाला येण्यास सांगितले. आणि अशा तऱ्हेने नवनाथची एमआयडीसीतील कामास सुरूवात झाली. मशिन शाॅपमध्ये त्याची कामास सुरूवात झाली.  सुरुवातीला काही किरकोळ कामे त्याने केली. हळुहळु मशीनवर काम करण्याची संधी त्याला मिळाली. दुसऱ्याच्या मार्गदर्शनाने त्याची सुरूवात सुरू झाली. पगारही चांगला मिळू लागला. वर्षभरात मशीनवर नवनाथचा चांगला जम बसला.

पण मशीनवर काम करून जेवनही स्वतः करावे लागत होते. त्यामुळे सर्वजण चेष्टा करत होते. बायकांच्या सारखी काय काम करता. नवनाथच्या वडीलांना काहींनी सुचवले की याचे लग्न करून टाका म्हणजे घरच्या कामाचा त्याचा ताण कमी होईल.  नवनाथने हा विषय चेष्टावर घालवला पण शेजारच्या लोकांनी मनावर घेतले. काहींनी तर गावाकडे मुलगी पाहण्यासाठी निरोपही धाडला. अवघ्या चार दिवसात नवनाथला पाहायला गावाकडची मंडळी आली. पाच भावात एकटीच असणाऱ्या मुलीला साताऱ्यात द्यायचे हा त्या मंडळींचा विचार होता. नवनाथ सांगेल ती गोष्ट त्यांनी मान्य केली. काही दिवसात नवनाथचे लग्नही झाले. अवघ्या २१ व्या वर्षी नवनाथचे लग्न झाले. लग्न झाल्याने खर्च वाढला. जबाबदारी वाढली. त्यावेळी नवनाथला ८०० रुपये पगार होता. ओव्हरटाईम करून एक हजार रुपये मिळायचे पण त्यात काही भागत नव्हते. पगार वाढावा अशी अपेक्षा होती. पण मालक काही वाढवून द्यायला तयार नव्हता. अखेर दुसरीकडे नोकरी शोधण्याशिवाय नवनाथला पर्याय नव्हता.

एक जाहिरात वाचली. तिकडे दोन हजार रूपये पगार देणार होते. तेथे प्रयत्न केला. गेअर तयार करण्याचा तो कारखाना होता. तेथे काही दिवस काम केल्यानंतर नवनाथच्या असे लक्षात आले की हे मशीन स्वतः खरेदी करून काम सुरू केले तर चांगले पैसे आपणास मिळू शकतील. नवनाथने ठरवले काहीही करायचे पण मशीन खरेदी करायचे. यासाठी त्याने पैशांची जमवाजमव सुरू केली. सासुरवाडीच्या लोकांनी १५ हजार रुपये दिले. नवीन सायकल होती,ती नवनाथने विकली.  घरामध्ये टीव्ही होता तो विकला.तरीही रक्कम अपुरी पडली म्हणून लग्नात दिलेली सोन्याची अंगठी विकली.असे करून नवनाथने २५ हजार रुपये मशिन खरेदी साठी जमा करून मशीन विकत घेतले. त्या बरोबर गरजेचे  सर्व किरकोळ साहित्य विकत घेतले.

अवघे २५ हजार रुपये भांडवल घालून नवनाथने १९९३ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एका भाड्याच्या शेडमध्ये त्याने या व्यवसायाला सुरूवात केली. पहिल्या महिन्यातच नवनाथला असे लक्षात आले की आपणास जेवढा पगार मिळत होता त्यापेक्षा जास्त पैसा यातून मिळतो. प्रथम तो स्वतःच काम करत होता. काम शोधण्यापासून ते त्याची पुर्तता करण्यापर्यंत सर्वच काम तो करत होता. खर्च वजा जाता बऱ्यापैकी पैसा त्याच्या हातात राहात होता. पैसा जास्त मिळतो म्हटल्यानंतर त्याला कामाला उत्साह आला. रात्रनदिवस काम तो करत होता.



नवनाथ म्हणतो, ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. काम शोधणाऱ्याला धंद्यात मंदी आहे अशी स्थिती कधी येतच नाही. फक्त राबण्याची तयारी पाहिजे. डोक्यात सतत त्याचा ध्यास असायला हवा. मला हे करायचे आहे. मला हे वाढवायचे आहे. मी निर्माण केलेले विश्व टिकवायचे आहे. त्याला भरभराटीला आणायचे आहे. हा पक्का निर्धार असेल तर मंदीतही काम भरपूर मिळू शकते. १९९६ आणि २००८ च्या मंदीची मोठी लाट होती. पण कामाचा सतत ध्यास ठेवल्याने मला मंदीही कधी जाणवलीच नाही. स्वतः कामगार असल्याने दुसऱ्या कामगारांना सुद्धा कशी वागणूक द्यायची ही जाणीव मला होती. स्वतः सोळा सोळा तास काम केल्याने मोठा अनुभव होता. 

नवनाथने १९९८ ला या कामातून दुसरे मशीन खरेदी केले. यासाठी दोन कामगार त्याने ठेवले. त्यामुळे त्याला कामातून थोडी उसंत मिळत होती. या फावल्यावेळात त्याने कामे शोधण्याचा प्रयत्न केला. यातूनही पैशाची अधिक बचत होऊ लागली. हळूहळू त्याने कामगार वाढवले.  दुसरे मशीन घ्यायला नवनाथला पाचवर्षे लागली पण तिसरे मशीन नवनाथने अवघ्या सहा महिन्यात घेतले. पण जागेची कमतरता भासू लागली. यासाठी त्याने मोठी जागा शोधली.

पण मशीन वाढवण्यासाठी आता संधी नव्हती. २००३ मध्ये सहा मशीनवर काम सुरु होते. कामाच्या दोनदोन शिफ्ट सुरु झाल्या होत्या. मग तेव्हा स्वतःची जागा हवी यासाठी प्रयत्न सुरू केला. अखेर २००५ साली नवनाथने स्वतःची जागा खरेदी केली. एप्रिल २००६ मध्ये आठ हजार स्केअर फुटचा प्लाॅटमध्ये बारा मशीनसह काम सुरू केले.  यातून काम वाढेल तसे जुनी देशी बनावटीची मशीन बदलून गरजेनुसार इम्पोर्टेड मशीन खरेदी केले. असे करत आता तो छान उद्योजक झाला आहे. कवडे इंजिनिअरिंग वर्क्स  या नावाने त्याचा हा उद्योग साताऱ्यामध्ये नावारुपाला आला आहे. अवघा १२ वी शिकलेला हा तरूण केवळ जिद्द आणि स्मार्ट वर्कच्या जोरावर आज मोठा उद्योजक झाला आहे.

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

No comments:

Post a Comment