Saturday, November 2, 2019

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।


पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे । 
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।। 187 ।। अध्याय 14 वा 

ओवीचा अर्थ - ब्रह्मदेवाचें आयुष्य मिळावें आणि मग निजूनच राहावें, यावाचूंन त्याला दुसरा नादच नाही. 

सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामस वृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सान्निध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील, तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात. एखाद्या अधिकाऱ्याने पद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसी वृत्तीच्या अधिकाऱ्यामुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्ते अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आहे. काही अधिकारी याला अपवाद असतात, पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत, असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सान्निध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसी वृत्तीचे झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा करताना अशा सरकारी कारभारामुळे बाधा पोहोचते आहे, याकडे हे सरकार तरी लक्ष देते का? झोपलेल्या सरकारला जाग येईल तरी कधी? नुसत्या शासकीय फायली इकडून तिकडे करून आयता पगार लाटण्यातच यांचे कामकाज चालते. कागदावरच महासत्तेच्या गप्पा मारण्यात सर्व जण पटाईत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती खूप गंभीर आहे. तमोगुणाचे साम्राज्य पसरलेले आहे. पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. अध्यात्मातही असे असतो. ब्रह्मसंपन्न होतात पण कार्य काही करत नाहीत. तर काही ब्रह्म संपन्न होण्याचे स्वप्न पाहातात. पण काहीच न करता केवळ स्वप्नच पाहातात. अध्यात्मात कर्माला महत्त्व आहे. साधनेचे कर्म हे नियमित व्हायलाच हवे. यासाठी अंगी सात्विक वृत्ती वाढायला हवी. ऐशआरामात जीवन जगणारे त्यातच गुंग राहीले तर त्यांची अध्यात्मात प्रगती कशी होईल.  

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

No comments:

Post a Comment