Thursday, October 31, 2019

ज्ञान - अज्ञान


पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते, पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल.

ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नांव ।। 79 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असें म्हणतात आणि त्या अज्ञानानें गुंडाळलेला जो चितप्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ असे नांव आहे.

रात्र नाही व दिवसही नाही त्या वेळेला सांजवेळ म्हटले जाते. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते किंवा स्वरूपज्ञान नसते तेव्हा ते केवळ अज्ञान असते. अज्ञानात ज्ञान गुरफटलेले आहे. फळाच्या आतमधील गर खाण्यास योग्य असतो. साल टाकून द्यावी लागते. ती साल काढावी लागते तरच आतला गर खाता येतो. सालीसकट गर खाल्ला तर त्याची चव वेगळी लागते. गराची गोडी जाते. चवीचे खाणारा असतो तो साल काढून गर तेवढाच खातो. तसे ज्ञान हे अंतर्मनात असते. ते हस्तगत करण्यासाठी अज्ञानाचे पडदे दूर करायला हवेत. अज्ञानासकट ज्ञान हस्तगत करता येत नाही. यासाठी अज्ञान दूर करायला हवे. प्रकाश जिथे आहे तिथे अंधार हा सापडत नाही. तसे ज्ञान जिथे आहे तेथे अज्ञान नसते. फळ कच्चे असताना त्याच्या सालीचा रंग वेगळा असतो. सालीच्या रंगावरून फळाची परिपक्वता समजते. फळ पक्व झाल्यावर सालीचा रंग वेगळा असतो. तसे ज्ञान पक्व झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये बरेच बदल झालेले दिसतात. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात एक पक्वता असते. त्याच्या व्यवहारातही फरक जाणवतो. ही पक्वता आल्यानंतर त्याने अज्ञानाची झापड दूर करावी लागते. तरच खऱ्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. अज्ञानामुळे त्या ज्ञानाची गोडी कमी होते. पक्वता आल्यावर फळे सुद्धा आपोआप फुटतात व त्यातून बिया बाहेर येतात. गर बाहेर येतो. पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते, पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल. ज्ञानाच्या पक्वतेची जाणीव, तो बोध व्हायला हवा. सद्‌गुरू कृपेने ही पक्वता येते. जाणीव होते. त्याचा बोध होतो. त्या अनुभूतीने अज्ञान आपोआप दूर सारले जाऊन ज्ञानाची वाट सुकर होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment