Thursday, October 10, 2019

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।

 ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्‍चयो आघवा । वायां जाय ।। 626 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला, तरी त्याचा त्याला काय उपयोग? त्याप्रमाणें आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवूं शकलें नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे जे काही ते हेंच असा ज्याचा निश्‍चय असतो त्याचा तो असा निश्‍चय सर्व व्यर्थच जातो.

जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भागातही आता विकासाची चक्रे फिरू लागली आहेत. तंत्रज्ञानाने तेथीलही जीवन बदलवले आहे. प्रगतीच्या वाटा आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे, हेही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच. देहाच्या सुखासाठी ही सारी धडपड सुरूच आहे; पण हे सुख क्षणभंगूर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल, असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते, हेही खरे आहे, पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच, की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याच्या हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरुपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

No comments:

Post a Comment