Friday, April 27, 2012

आजऱ्यातील किमयागार

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्‍यात गणेश नार्वेकर यांनी पोल्ट्रीतील इंटिग्रेशन मॉडेल यशस्वीपणे राबविले आहे. गेल्या दहा वर्षांत दोन वेळा आलेले बर्ड फ्लूच्या धास्तीचे संकट आणि तेजी मंदीचे असंख्य चक्र झेलत पुढे आलेल्या उमद्या तरुणाची ही कथा
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्याचा पश्‍चिम घाटमाथा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. हिरण्यकेशी, चित्री या छोट्या छोट्या नद्यांच्या खोऱ्यातील आजरा हा पुरोगामी तालुका. घनसाळ, काळाजिरगा तांदळाचे कोठार येथीलच. 80 इंच पावसाचा हा प्रदेश. धबधबे, जंगलामुळे पर्यटनस्थळाचे महत्त्व लाभलेला. या भागात कुक्‍कुटपालन व्यवसाय करणे ही मोठी जोखीमच; पण गणेश नार्वेकर या तरुणाने अनेक संकटे झेलत, परिस्थितीवर मात करत आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. गणेश नार्वेकर मूळचे पोळगावाचे. वडिलोपार्जित 40 एकर शेती. वडील गुणाजी सोमाजी नार्वेकर हे शेतकरीच. पारंपरिक भात, ऊस हीच पिके मुख्यतः ते घेतात. आजही ते शेती सांभाळतात. गणेश यांचे प्राथमिक शिक्षण पोळगावातच झाले. दहावी आजरा हायस्कूलमध्ये झाली. 1994 मध्ये त्यांनी मौनी विद्यापीठाच्या "आयसीआरई'मध्ये इलेक्‍ट्रिकलमधून पदविका पूर्ण केली. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. त्या काळात व्यवसाय करावा असा विचारही त्यांच्या मनात नव्हता. चार-चौघांप्रमाणे तेही नोकरीच्या मागे लागले. मुंबईत नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. औद्योगिक मंदीचा तो काळ होता. त्यामुळे नोकरी मिळविणे हे आव्हानच होते. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1999 मध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दोन वर्षे त्यांनी नोकरी केली; पण काहीतरी वेगळे करण्याचा इरादा असणारे गणेश नोकरीत रमू शकले नाहीत. नोकरीत वेगळे करण्याची धडपड सुरूच होती. यातून स्पर्धा वाढत राहिली. कटकटी वाढल्या. नोकरीत फारसे आव्हानात्मक काहीच वाटत नव्हते. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याने मनासारखे काहीच घडत नव्हते. काही गोष्टी पटत नसूनही गप्प बसावे लागत होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा विचार केला.
गावी गणेश यांचे बंधू राजेश हे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होते. दहा ते पंधरा हजार पक्षी ते सांभाळत. त्यांच्यासोबत या व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजऱ्यापासून जवळच मेंडोली येथे कुक्कुटपालनासाठी स्वतंत्र जागेची पाहणी केली. येथील शेती तुकड्या तुकड्यांची. एकरात चार-चार भागीदार. त्यामुळे जमिनी खरेदीसाठी सुमारे 15 जणांना एकत्र करणे गरजेचे होते. त्यातील अनेकजण मुंबईत नोकरीला. बैठकांवर बैठका झाल्या. या सर्वांची सहमती मिळविण्यातच त्यांचे चार महिने लोटले. अखेर जमीन खरेदी झाली.
अति पावसाचा प्रदेश असला तरी येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासतेच. कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला बारमाही पाण्याची गरज. टॅंकरने पाण्याची सोय करून ते परवडणारे नव्हते. अखेर कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. पण 200 फुटांपर्यंत नुसती मातीच लागली. सलग चार दिवस बोअर मारल्यानंतर सुमारे 700 फूट खोलीवर चांगले पाणी लागले. पाण्याची व्यवस्था झाली.
माळरान, जवळपास वस्ती नसल्याने कामगार कामावर येण्यास कचरत. वन्यप्राण्यांच्या भीतीने रात्रीच्यावेळी तेथे राहायलाही कोणी तयार होत नव्हते. वाहतुकीची सोयही नव्हती. अशा अडचणीमुळे गणेश यांनाच फार्मवर थांबावे लागे. हॅचरीचा विचार सतत घोळत असल्याने हा दोन-तीन महिन्यांचा अवघड कालावधी कसा लोटला हे त्यांना समजलेच नाही. सुरवातीची दोन-तीन वर्षे केवळ या व्यवसायाचा अभ्यास करण्यातच गेली. व्यवसाय करताना कामगारही माहीतगार असण्याची गरज आहे. या डोंगरी भागात माहीतगार कामगार नव्हते. पण आलेल्या कामगारांना घडविण्याची जिद्द त्यांनी बाळगली. पुण्यातील भारतीय पोल्ट्री व्यवस्थापन संस्थेमध्ये तीन कामगारांना स्व खर्चाने प्रशिक्षणासाठी त्यांनी पाठविले. कामगारांना शिक्षित केल्याने व त्यांची योग्य साथ मिळाल्याने त्यांच्या अनेक समस्या सुटल्या.
"व्यंकटेश फार्मिंग' नावाने हॅचरी सुरू केली. पण उबविण्यासाठी लागणारी अंडी विकत घेण्यासाठीच पैसे नव्हते. त्यामुळे नवेच संकट गणेश यांच्यासमोर उभे होते. बॅंकांच्या चकरा मारून पैसे गोळा केले. दोन-तीन महिने सतत बॅंकांचे उंबरे झिजविले. आज हा कागद राहिला उद्या तो कागद आणा. असे करून पैशाची जोडणी त्यांना करावी लागली. अंडी बंगळूरहून विकत घ्यावी लागत होती. पाच रुपयांना एक अंडे मिळत होते. एक पिलू तयार करण्यासाठी आठ ते नऊ रुपये खर्च होत होते. त्यातच स्थानिक स्पर्धकांनी दर पाडले. त्यांनी पिलांचा दर चार रुपयांपर्यंत खाली नेला. त्यामध्ये गणेश यांचे नुकसान झाले. तोटा सहन करूनही त्यांनी व्यवसाय सांभाळला. 2002 मध्ये हॅचरीत आठवड्याला दहा ते 20 हजार सेट घेत होते. पुढे त्यांनी ब्रीडर फार्म सुरू केला. एका पक्षाला 600 ते 700 रुपये खर्च येत होता. त्या पैशाची व्यवस्था मका, सोया व्यापाऱ्यांकडे पत ठेवून केली. या व्यापाऱ्यांनी त्यांना मोठे सहकार्य केले. त्यांच्याच आधारावर आज मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला.
आव्हाने असतील तर व्यवसाय जोमात वाढतो, असे म्हणतात. गणेश यांच्याही बाबतीत तसेच घडले. आव्हानावर आव्हाने येत होती. व्यवसाय चांगला सुरू होता त्यातच बर्ड फ्लूचा दणका बसला. विकत घेण्याचे सोडा, कोंबडी फुकट घेण्यासही कोणी तयार नव्हते. शेवटी लोकप्रबोधन करण्यासाठी त्यांनी आजरा तालुक्‍यात प्रथमच चिकन महोत्सव आयोजित केला. त्यात 20 रुपयांना कोंबडी विकली गेली. परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या फडकऱ्यांना कोंबड्या स्वस्तात विकल्या. एका कोंबडीसाठी 60 रुपये खर्च असूनही 20 रुपयांना विकणे भाग पडले. काही कोंबड्या मारून पुराव्याही लागल्या. यात जवळपास 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले. पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही. सोडून काहीच करता येणे शक्‍य नव्हते. आज ना उद्या धंदा भरभराटीला येईल या आशेनेच गणेश पावले टाकत राहिले. त्याशिवाय पर्यायही नव्हता. जानेवारीत स्टेट बॅंकेचे 80 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. पण पैसे हातात आले नव्हते. त्यातच फेब्रुवारीत बर्ड फ्लूची साथ आली होती. बॅंकेने पैसे देण्यास टोलवाटोलव सुरू केली. मे-जूनच्या दरम्यान बर्ड फ्लूचा प्रभाव कमी झाल्यानंतर बॅंकेने मंजूर रक्कम दिली. हाच एक मोठा आधार त्यांना मिळाला. त्यानंतर मात्र व्यवसाय वाढत गेला. 2005 पर्यंत दुचाकीवरूनच फिरणारे गणेश यांनी व्यवसाय वाढल्यानंतर चारचाकी घेतली. 2009 पर्यंत भावासोबत भागीदारी करून व्यवसाय केला. त्यानंतर राजीवने त्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. आता या व्यंकटेश फार्मिंगच्या व्यवसायामध्ये गणेश यांच्या सोबत त्यांची पत्नी अपर्णाही भागीदार आहेत.
आठवड्याला एक लाख पक्षी वाढविण्याची क्षमता गणेश यांनी ठेवली. पक्षांची वाढ करण्यासाठी भागातील शेतकऱ्यांनाही धंद्यात सामावून घेतले. गडहिंग्लज, चंदगड, दड्डी, बेळगाव, निपाणी आदी ठिकाणच्या जवळपास 125 शेतकऱ्यांना पक्षी संगोपनासाठी दिले जातात. पक्ष्यांच्या वाढीसाठी लागणारे खाद्य, औषधे आदींचा पुरवठा "व्यंकटेश फार्मिंग'मधून केला जातो. वाढविलेले पक्षी साडेतीन रुपये किलोने विकत घेतले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीची भीतीही राहात नाही. 2009 मध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरवातीच्या काळात कोणीही शेतकरी समोर येत नव्हते; मात्र आज अनेक शेतकरी या धंद्यात येण्यास इच्छुक आहेत. विश्‍वासर्हतेमुळेच धंदा वाढतो, हाच यातून अनुभव गणेश यांनी घेतला.
हवामानबदलाच्या परिणामांनाही गणेश यांना सामोरे जावे लागत आहे. तापमानवाढीमुळे मरतूक वाढली आहे. उन्हाळ्यात मालाला योग्य दर मिळत नाही. विक्रीवरही परिणाम होतो. पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्यातील जीवजंतूंचे प्रमाण वाढते. रोगराईचा धोकाही संभवतो. मुख्यतः आजऱ्याच्या हवामानात आर्द्रता अधिक आहे. हे हवामान पोल्ट्री उद्योगाला पोषक नाही. पण यावर कृत्रिम उपाय योजून हा व्यवसाय करता येणे शक्‍य आहे. संरक्षणासाठी पडदे लावले आहेत. गटारीतील पाण्याचा योग्य निचरा व्हावा, याची त्यांनी काळजी घेतली आहे.
व्यवसाय वाढवताना संपर्क वाढविणे गरजेचे असते. विपणनच्यादृष्टीने ते महत्त्वाचे आहे. पूर्वी फक्त गोव्यालाच माल पाठविला जात होता. आता मुंबई, पुण्यापासून कोल्हापूर, हुबळी, बेळगाव, रायबाग आदी ठिकाणीही उत्पादनाची विक्री केली जात आहे. कामगारांचे व्यवस्थापनही योग्य प्रकारे ठेवले जाते. त्याच्या कुवतीनुसारच त्याला काम दिले जाते. आजच्या घडीला 300 कामगारांमध्ये 100 महिला कामगार येथे काम करतात. कामगारांना वेळेत पगार दिला की विश्‍वास वाढतो. कामगारांच्या येण्याजाण्याची व्यवस्थाही गणेश यांनी केली आहे. खरे तर व्यवसायामध्ये कामगार हीच खरी गुंतवणूक आहे. कामगारच उत्पन्न मिळवून देतात. त्यासाठी त्यांची विशेष काळजी येथे घेतली जाते. तसे कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गणेश यांनी स्कॉडबुक ठेवले आहे. पण तो व्यवस्थापनाचा भाग आहे. शंभर चांगल्या गोष्टी करताना काही चुका त्यांच्याकडून होत असतात. त्या पोटात घालून चुका होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला आहे. कामगारांच्या लाभलेल्या समर्थ साथीमुळेच पोळगाव येथे दुसरी हॅचरी सुरू करण्याचा गणेश यांचा प्रयत्न आहे. 2002 मध्ये आठवड्याला 10 ते 20 हजार अंड्यांचे हॅचिंग करत होते. आता एक लाखापर्यंत हॅचिंग करण्याची क्षमता ठेवली आहे. दुसरी हॅचरी सुरू करून दोन लाखांपर्यंत हॅचिंगची क्षमता वाढविण्याचे गणेश यांचे प्रयत्न सुरू आहेत.

No comments:

Post a Comment