Sunday, April 8, 2012

यशस्वी मत्स्यशेतीतून शेतीत वाढवला नफा

यशस्वी मत्स्यशेतीतून शेतीत वाढवला नफा
.....................
कोल्हापूर जिल्ह्यातील आनंदा पाटील यांचा शेततळ्यातील प्रयोग
....................
शेतीला पूरक व्यवसाय करून शेती फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न केले, तर सर्व काही शक्‍य आहे. याच विचाराने मत्स्यशेतीची जोड देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी येथील आनंदा पाटील यांनी शेतीतला फायदा कसा वाढवायचा, याचे आदर्श उदाहरण शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यातून त्यांनी शेततळे उभारले, त्यात मत्स्यशेती यशस्वी केली, त्यातून ते लाखभराची कमाई करीत आहेत.
........................................
राजेंद्र घोरपडे
....................................
पिके आपल्यासोबत बोलतात; पण शेतीची ही बोली कळली पाहिजे. ज्याला ही भाषा कळली, तो शेतीत विकास करतोच. शेती व्यवसाय तोट्याचा आहे, अशी हाकाटी काहीजणांकडून केली जाते; पण हा व्यवसाय फायदेशीर बनविणारेही कमी नाहीत आणि तसा सकारात्मक विचार केला, तर त्यांना उत्तरेही आपोआपच मिळत जातात. शेतीला पूरक व्यवसाय करून शेती फायदेशीर करणे शक्‍य आहे, याच विचाराने शेतीला मत्स्यशेतीची जोड देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी (ता. करवीर) येथील आनंदा बळवंत पाटील यांनी शेतीचे अर्थकारण सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची सात एकर जमीन आहे. त्यांचे वडील बळवंत पाटील शेती करत होते तेव्हा पाण्याची सुविधा नव्हती. माळरानात भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग अशी पिके ते घेत. आनंदा यांनी या अशा शेतीत प्रगती करण्याचा विडा उचलला. गावात सोसायटीने पाणीपुरवठा योजना राबविल्यानंतर नगदी पिकांकडे त्यांचा कल वाढला; पण माळरानावर योजनेच्या पाण्याचा पुरवठा कायमस्वरूपी होत नव्हता. अशाने ऊस वाळण्याचे प्रकार होऊ लागले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंडल कृषी अधिकारी आर. के. शेळके आणि तालुका कृषी अधिकारी बी. एस. पाटील यांची त्यांनी भेट घेतली. शेळके यांनी त्यांना शेततळ्याची योजना सुचविली.

शेततळ्यातून विकास
रोजगार हमी योजनेतून एक लाख 41 हजार रुपयांचे अनुदान शेततळ्यासाठी होते, याचा लाभ घ्यावा, असा सल्लाही त्यांना मिळाला. त्यानुसार आनंदा यांनी शेततळे खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना साथही मिळाली. 30 बाय 30 बाय 4 मीटर या आकाराचे शेततळे खोदण्यास सुरवात केली आणि अवघ्या आठ फुटांवरच जिवंत पाण्याचे झरे मिळाले. यामुळे पॉलिथिन शीटचा खर्चही वाचला. अवघ्या 75 हजार रुपयांत शेततळे झाले. खोदाईसाठी 55 हजार, तर कुंपणासाठी 18 हजार रुपये असे अनुदान मिळाले. शेततळ्याच्या निर्मितीनंतर ऊस, सोयाबीन, कलिंगडे आदी नगदी पिके आनंदा घेऊ लागले. त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांचीही शेतीच्या कामात साथ मिळाली. पुढे त्यांनी दीड एकरावरील उसासाठी ठिबक केले. स्वतःचे तळे असल्याने पाण्यावर अवलंबून राहण्याचा प्रश्‍न मिटला, ऊस वाळून जाण्याची चिंता मिटली. उन्हाळ्यातही पाणी राहात असल्याने बागायती पिके घेणे शक्‍य झाले.

मत्स्य शेतीकडे...
योगायोगाने त्याच वेळी कोल्हापूर परिसरातील कसबा बावडा येथील मत्स्य व्यवसाय केंद्रात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता, त्यामध्ये आनंदा सहभागी झाले. सात दिवसांच्या प्रशिक्षणानंतर मत्स्यशेती करणे सहज शक्‍य आहे, असा विश्‍वास आनंदा यांना वाटला. त्यांनी लगेचच या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. रंकाळा तलावाशेजारील मत्स्य बीज केंद्रात जून- जुलै- ऑगस्ट या कालावधीत मत्स्य बीज मिळते. तेथून कटला, रोहू, मृगल या जातीचे बीज घेऊन त्यांचे संगोपन सुरू केले.

मत्स्यबीजांचे संगोपन
मत्स्यबीजांच्या संगोपनाबाबत माहिती देताना आनंदा म्हणाले, की मत्स्य बीज केंद्रात डब्यामध्ये मत्स्य बीज मिळते. 230 रुपयांना एक डबा मिळतो. साधारणपणे एका डब्यात 500 बीज असतात. असे दहा डबे खरेदी करून तळ्यात सोडले. नऊ महिने या बीजांचे संगोपन करावे लागते. या बीजांची वाढ होण्यासाठी त्यांना खाद्य पुरविण्यात येते. तळ्यात हिरवे किंवा निळसर प्लवंग किंवा शेवाळ वाढविण्यासाठी पंधरा दिवसातून तळ्यात 100 किलो शेण आणि 200 ग्रॅम युरियाचे मिश्रण करून टाकण्यात येते. एक दिवसाआड भाताचा कोंडा, सूर्यफूल पेंड, भुईमूग पेंड हे खाद्य द्यावे लागते. वर्षाला शेंगदाणा पेंडेची 10 पोती, भाताचा कोंडा तीन हजार किलो, सूर्यफूल पेंड 200 किलो इतके खाद्य लागते. पाच हजार बीजांतील जवळपास 50 टक्के बीज मृतवत होते. दोन हजार ते 2,500 पिल्लांची वाढ चांगली होते.

दारातच विक्री...
मत्स्य शेती करणाऱ्या व्यक्ती ठराविकच असल्याने याची माहिती मासे पकडणाऱ्या व्यापाऱ्यांना असते. हे व्यापारी स्वतः संपर्क करून चौकशी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील बीड, हळदी भागातील कोळी स्वतः तळ्यावर येऊन मासे पकडतात. मासे पकडण्याची जाळी आदी साहित्यही ते स्वतःसोबत घेऊन येतात, यामुळे आपणास काहीच कष्ट पडत नाहीत. मासे पकडून काट्यावर वजन केले जाते. बाजारभावानुसार प्रति किलो 60 ते 70 रुपये दर मिळतो. एप्रिल - मेमध्ये कामाचा ताण कमी असतो. अशा कालावधीतच माशांची काढणी येत असल्याने इतर त्रासही होत नाही. एक दिवसाआड दररोज 100 ते 150 मासे पकडले जातात. माशांची विक्री झाल्यानंतर व्यापारी नियमितपणे रक्कम पोच करतात. उन्हाळ्यात लाखभर रुपये हातात मिळत असल्याने समाधान वाटते. सन 2007 पासून आनंदा मत्स्यशेती करत आहेत. आतापर्यंत चार हंगामांत त्यांना वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. यंदाही असेच उत्पन्न मिळेल असा विश्‍वास त्यांना आहे. शेतीला हा जोडव्यवसाय मिळाल्याने शेतीमध्येही प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
................................
* आनंदा पाटील यांच्या मत्स्यशेतीचा तपशील (हंगामातील)

1. मत्स्यबीज - 2,300 रु.
2. भुईमूग शेंगापेंड खाद्य - 9,500 रु.
3. भाताचा कोंडा खाद्य - 15,000 रु.
4. शेणासाठी खर्च - 900 रु.
5. सूर्यफूल पेंड खाद्य - 3600 रु.
6. युरिया (एक पोते) - 300 रु.
7. मजुरी खर्च (वर्षभराचा) - 15,000 रु.
..............................................................
एकूण खर्च - 46,600 रुपये

मत्स्यशेतीतून मिळणारे उत्पन्न ः
साधारणपणे दोन ते अडीच हजार मासे मिळतात. साधारणपणे एका माशाचे वजन एक ते दीड किलोपर्यंत भरते. 60 ते 70 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळतो. साधारणपणे तीन हजार किलो उत्पादन मिळते.
अशा रीतीने 1,80,000 रुपयांचे उत्पन्न हाती येते. खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा 1,33,400 रुपये मिळतो.
...............
संपर्क ः आनंदा पाटील - 9623318798
कोथळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर

चौकट
शेती उत्पादनात वाढ
मत्स्य शेती केलेल्या तळ्यातील पाण्याचा वापर सुरू केल्यापासून शेतीच्या उत्पादनाला ते पूरक ठरले आहे. गेल्या हंगामात फुले 265 या जातीच्या उसाचे त्यांनी एकरी 90 टनांपर्यंत उत्पादन घेतले. मत्स्य तळ्यातील पाणी त्यांनी शेताला दिले आहे. यंदा या उसाचे निडवे आहे. यातील तीन उसांचे वजन नऊ किलो 800 ग्रॅम इतके भरले आहे. भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पीक स्पर्धेत आनंदा यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.

कोट
मत्स्य शेती केलेल्या तळ्यात शेवाळ वाढण्यासाठी युरिया आणि शेणाचा वापर केला जातो, तसेच यामध्ये माशांसाठी टाकण्यात आलेले खाद्य सर्वच्या सर्व वापरले जात नाही. त्याचे खत तयार होते. माशांची विष्टाही पाण्यातच सोडली जाते. यामुळे पाण्यात नैसर्गिक खताची निर्मिती होते. हेच पाणी पिकांना देण्यात येत असल्याने उत्पादनात वाढ होणे शक्‍य आहे.
- एच. एस. जाधव, मत्स्य विकास अधिकारी, कोल्हापूर

No comments:

Post a Comment