Friday, April 6, 2012

शेतीतील "मॅनेजर'

शेतीतील "मॅनेजर'
---
एक व्यवस्थापक आणि अर्थशास्त्राचा पदवीधर जेव्हा शेती करू लागतो, तेव्हा परिवर्तन न झाले तरच नवल... पारगाव (जि. कोल्हापूर) येथील संजय घाटगे यांची यशकथा....
---
राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
---

पंचगंगेसह निरनिराळ्या छोट्या छोट्या नद्या, त्यांवरील चार धरणे. या धरणांमुळे सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेला कोल्हापूर जिल्हा. या जिल्ह्यातील नवे पारगाव असेच संपन्न वारणा खोऱ्यातील गाव. या खोऱ्यात बहुतेक शेती अगदी सुपीक. येथील जनता कष्टाळू, त्यामुळे येथील माळरानावरही शेतीचे मळे फुललेले. सारा परिसर हिरवाईने नटलेला. वारणा कारखान्यामुळे या परिसराचा कायापालटच झालेला आहे. येथील शेतकरी क्रियाशील बनला आहे. शेतीच्या जोडीला येथे उद्योगही असल्याने हातांना कामही उपलब्ध. जोडीलाच येथील शेतीमध्ये विविध प्रयोग अगदी जोमाने सुरू आहेतच. असेच प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय हिंदूराव घाटगे. शेतीमध्ये आणि विशेषतः ऊस लागवडीमध्ये किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहेत.

संजय हिंदूराव घाटगे बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना नोकरीस लागले. मेनन मेटॅलिक्‍स कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. जवळपास 25 वर्षे त्यांनी नोकरी केली. वरच्या पदावर असल्याने जबाबदाऱ्या अधिक होत्या. नोकरीत मानसिक समाधान असे कधी मिळालेच नाही, पर्याय नसल्यामुळे नोकरी करणे गरजेचे होते.

वडिलोपार्जित शेती आहे. चार एकर शेत, विहीर आहे. शेताजवळून ओढा गेला आहे. पाण्याची मुबलकता आहे. संजय यांचे वडीलही नोकरीस होते, त्यामुळे शेती वाटेकऱ्यालाच कसायला दिली होती. शेतात राबणार कोण? नोकरीमुळे शेतीत राबायची सवयच नव्हती. संजय हे अर्थशास्त्रातील पदवीधर, त्यामुळे त्यांना आर्थिक गणिते मांडणे सहज जमायचे. शेतीचीही आवड होती. नोकरीत समाधान नसल्याने ते शेतीत लक्ष घालू लागले. वाटेकरी वाटा खूपच कमी देतोय असे लक्षात आले, त्यामुळे त्यांनी घरीच शेती कसायचा विचार केला. नोकरी करत शेती कशी जमणार, असे सुरवातीला वाटू लागले; पण त्यांनी धीर सोडला नाही. प्रयोग करण्याची वृत्ती असल्याने त्यांनी ही जबाबदारीही स्वीकारली. आर्थिक गणितात नोकरीपेक्षा शेतीच अधिक फायदेशीर दिसू लागली. नोकरीत वर्षाला जितके पैसे मिळतात. त्यापेक्षा अधिक पैसा शेतीत मिळतोय हे त्यांच्या लक्षात आले. मग नोकरीसाठी इतका वेळ का द्यावा. त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी, असे म्हणून त्यांनी नोकरी सोडली.

नोकरीतील व्यवस्थापनाचा अनुभव होताच; पण येथे शेतमजूर मिळणार कसे, लोकांची मदत होणार का, ही चिंता होतीच. पण एकदा कामाची सुरवात केल्यावर माणसे आपोआपच भेटतात असा अनुभव आला. जनसंपर्क वाढवला. आपण लोकात मिसळायला हवे, लोक आपोआपच आपल्यात मिसळतात. नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करतो, ही बातमी गाव परिसरात पसरली. तसे नवे सहकारीही भेटले. तळसंदे येथील एम. आर. पवार, अंबपचे पशुचिकित्सक प्रदीप साळुंखे, चावऱ्याचे संदीप पचिंबरे असे सहकारी मदतीला धावले. पुतण्या प्रसाद घाटगे शेती करतो, त्याचीही मदत झाली. शेतमजुरांना मजुरी वेळेवर दिली की ते नियमित कामाला येतात, आपणहून काम विचारतात. कामामध्ये समाधानी ठेवले तर त्यांची बांधिलकी वाढते.

वारणेच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी विविध उपक्रम सुरू केले होते, त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या. तांत्रिक माहिती मिळाली. कारखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतो. यातूनच उसाचे बियाणे करण्याची कल्पना सुचली. पहिल्या वर्षी कारखान्याच्या सहकार्याने उसाची रोपे तयार केली. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील संशोधन केंद्रातून उसाचे बियाणे आणले. एक डोळा पद्धतीने ते पिशवीत भरून त्याची रोपे तयार केली. त्यासाठी कारखान्याचे अनुदान मिळाले. त्यातून नदीकाठची माती आणली. गांडूळ खत, कंपोस्ट खते आदी कारखान्याने पुरवले. जवळपास 20 हजार रोपे तयार केली. अडीच रुपयाला एक या दराने रोपे विकली. खर्च वजा जाता सुमारे 50 हजार रुपये यातून मिळाले. यातून आपणही शेती उत्तम प्रकारे करू शकतो, असा विश्‍वास बळावला.

नवनव्या प्रयोगांच्या कल्पना सुचल्या. उसाची लावण केली. पुतण्या प्रसादने बटाट्याचे आंतरपीक कसे घ्यायचे हे सांगितले. त्यानुसार उसामध्ये आंतरपिके घेतली. बटाटा, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, हरभरा अशी आंतरपिके घेतली. यातून उत्पन्न वाढते, असे लक्षात आले. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बांधावर नारळाची रोपे लावली, केळीची रोपे लावली, सागवानाची झाडे लावली. भविष्यात ज्यातून उत्पन्न मिळेल, असे इतरही काही प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विहिरीला मुबलक पाणी आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याचे तंत्र डॉ. प्रदीप साळुंखे यांनी सांगितले. पाणी नियोजन त्यांच्याकडूनच शिकले. जमिनीचा वाफसा, त्याचे महत्त्व माहीत करून घेतले. योग्य संधीचा फायदा कसा उठवायचा, हे त्यांनीच सांगितले. उसाच्या लावणीसाठी माणसे अधिक लागतात, इतकी माणसे कशी जमवायची हा प्रश्‍न सतावत होता. माणसे कशी येणार ही काळजी होती; पण चावऱ्याच्या संदीप पचिंबरे यांनी यात वेळीच मदत केली.

सगळे चांगले चालले होते; पण शेती करताना निसर्गाची साथ असायलाच हवी, हवामानात बदल झाला की कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, या गोष्टींची कल्पना नव्हती. चांगला वाढलेला ऊस वाळू लागला आहे असे लक्षात आले; पण नेमके काय झाले आहे याची कल्पना नव्हती. येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना विचारले, त्यांनी कीड लागल्याचे सांगितले. यावर उपाय विचारण्यासाठी कृषी सेवा केंद्राची मदत घेतली. शेतात आलेल्या किडीची कल्पना दिली. करंगळीएवढी कीड आहे. पांढरी अळी आहे. आलेल्या लक्षणांवरून त्यांनी लगेच ही हुमणी कीड असल्याचे सांगितले. यावर उपायही सुचविले. त्यांच्या सांगण्यानुसार फवारणी केली; पण कीड नियंत्रणात आली नाही. हुमणीचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत उत्सुकता वाढली. कारखान्याने कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्रा. मोहिते यांचे हुमणी नियंत्रणावर व्याख्यान आयोजित केले होते, त्याचा लाभ घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक गोष्टी समजल्या. चुका समजल्या. वारणा भागातील हुमणी पाण्याने मरते हे त्यांनी सांगितले. त्यानुसार व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला. व्यवस्थापनाचा अनुभव असल्याने यावर उपायही सुचला.

अशा नैसर्गिक आपत्तींतून खर्च वाढत गेला. यावर कसे नियंत्रण करायचे, याचा विचार मनात घोळू लागला. कमी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यायचे, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मजुरीचा खर्च वाढत होता. तणांच्या नियंत्रणासाठी अधिक मजूर लागत होते, हे लक्षात आले. त्यातच मजुरांच्या टंचाईची समस्या होतीच. यातून तणनाशकांचा वापर करण्याची कल्पना सुचली, त्याचा वापर करून खर्च कमी केला. वेळेची बचत झाली. पाटाच्या पाण्याने तणांचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात आले. तसेच पाणीही अधिक लागते, विजेचा खर्चही वाढतो. यावर मिलिंद जाधव या मित्राने ठिबक सिंचनाचा पर्याय सुचविला. तात्यासाहेब कोरे शेती पूरक सहकारी संस्थेच्या सहकार्याने ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. ठिबक सिंचनाने पाणी, विजेची बचत झाली. मजुरीचा खर्च कमी झाला. तणनाशके, कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाचला. हुमणीवर ठिबक सिंचनातून कीडनाशक देता येते, नियंत्रणही योग्य होते.

चार एकरांतील शेती वाढविण्याचा विचार आता संजय करत आहेत. ग्रीन हाऊस, पॉली हाऊसचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे ओढा आहे. पैसा देणारी पिके घेऊन उत्पन्न वाढविण्यावर त्यांचा भर आहे. शेतीत जम बसला आहे. व्यवस्थापन योग्य ठेवले तर शेती करणे सहज शक्‍य आहे. विविध प्रयोग सुरू आहेत. आंतरपिकांचा प्रयोग फायदेशीर ठरला. उत्पन्न वाढविण्यासाठी होणाऱ्या चुका विचारात घ्याव्यात, त्या सुधाराव्यात. बियाणे प्लॉटमध्ये अधिक फायदा मिळतो. विक्रीची हमी असते. दरही चांगला मिळतो. पुढे असेच प्रयोग करायचा विचार आहे.

(9890417306)
---

No comments:

Post a Comment