Tuesday, July 20, 2010

तेजाची वाट

जे जया वाटा सूर्य जाये । तेउते तेजाचे विश्‍व होये ।।
तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणउनी ।।
आदर्शवादी व्यक्ती, संत ज्या मार्गाने जातात. त्या वाटावर आनंदाचे नंदनवन फुलते. यामुळे अशा महंत व्यक्ती आपल्या घरी याव्यात अशी इच्छा आपण मनी धरतो. अशा संतांचे चरण आपल्या हुंबऱ्याला लागावेत. त्यांच्यातुन ओसंडणाऱ्या प्रेमाने मनातील नाराजी, यातना दूर पळतात. त्यांच्या विचारांनी, उपदेशांनी दैनंदिन जीवनात उत्साह वाढतो. अशा या तेजस्वी संतांचा नित्य सहवास लाभल्यास आपणही तेजस्वी होऊन जाऊ. माउली, तुकोबांच्या पालख्या आता पंढरीत दाखल झाल्या आहेत. वारीचा मार्ग ज्ञानोबा, तुकोबांच्या जयघोषाने चैतन्यमय होतो. असे चैतन्य आपल्या गावाही निर्माण व्हावे यासाठी केवळ देहु, आळंदीहून निघणाऱ्या पालख्या आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघू लागल्या आहेत. पावसहून स्वामी स्वरुपानंदांची, सासवडहून सोपानदेवांची, त्र्यंबकेश्‍वरहून निवृत्तीनाथांची तसेच इतर अनेक संतांच्या पालख्या पंढरीत येतात. आपल्या गावाची पायवाटही चैतन्यमय व्हावी हीच या वारकऱ्यांची इच्छा असते. विठोबांच्या दर्शनाने त्यांच्यात पुन्हा पुढच्यावर्षी दिंडीत सहभागी होण्याचे बळ मिळते. त्यांचे सारे शरीर वारीच्या ओढीने तेजस्वी होते.

No comments:

Post a Comment