Monday, July 5, 2010

आली आषाढी

आली आषाढी

सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे
आणि लाभालाभ न धरावे, मनामांजी
एथ विजयपण होईल, का सर्वथा देह जाईल
हे आधिची काही पुढील , चिंतावेना

आषाढीची वारी सुरु झाली. ज्ञानोबा- तुकोबांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने अद्यापही शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त करत आहेत. अशा या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बेजार झाला आहे. आणि आशातूनच तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अशा निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची खरी गरज आहे. वारीचा आनंद अशा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. मन ज्ञानेश्‍वरीत डुबवायला हवे. शेतात अधिक उत्पन्न झाले म्हणून हरळूनही जाता कामा नये आणि निसर्गाच्या अवकृपेने शेत वाया गेले म्हणून निराश होऊनही बसू नये. कर्जाचे ओझे वाढेल याची चिंता करण्याची गरज नाही. शांत मनाने पुन्हा प्रयत्न करीत राहणे हा माऊलीचा उपदेश अंगिकारायला हवा. कर्जामुळे जीवन संपविण्याचा विचार मनात घोळत असेल तर तो पुसून टाकायला हवा. यासाठी माऊलीच्या उपदेशांच्या रसात डुंबायला शिकले पाहीजे. माऊली प्रेमाने भरविते ते खायला शिकले पाहीजे. कर्जबाजारी झालेतर कोणी फासवर देत नाही. मग चिंता कशाची ? जीवन संपविण्याचा विचार कशासाठी ? शेती एकदा धोका देईल दोनदा देईल पण तिसऱ्यांदा तरी निश्‍चितच आधार देईल. कर्जाचे ओझ्यातून एकदा तरी मुक्ती मिळेल. यासाठी जीवन संपवण्याच विचार योग्य नाही. अपयश पदरी आल्यावर बोलणारे अनेक असतात पण चिंता न करण्याचा सल्ला देणारी माऊलीच असते. काही होत नाही काम करत राहा यश येईल असा आधार देणारी माऊलीच असते. तिच्या आधारावर जगायला शिकले पाहीजे. मग आत्महत्येचा विचार कधीही मनाला स्पर्ष करणार नाही.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment