एहींचि पांचे द्वारी । ज्ञानासिं धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ।।
मनाला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर राहिले तरच साधना होते. मन नेमके भरकटते कशामुळे ? आपणास जेवताना अनेक पदार्थ समोर ठेवले तर हे खाऊ का ते खाऊ असे होते. मन चलबिचल होते. एकदम सगळे पदार्थ पाहून काही वेळेला खाण्याची इच्छाच राहात नाही. असे आपणास कित्येकदा होते. कुरणातील हिरवागार चारा पाहून जनावरेही भांबावतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. साधनेच्या काळात आपल्यामध्ये सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. अति खोलवर एखाद्या गोष्टीचा विचार होतो. दूरचे आवाच स्पष्ट ऐकू येतात. दूरचे वासही स्पष्ट समजतात. इतकी ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. दूरच्या वासाने मन विचलित होऊ नये यासाठी काही जण साधना करण्यापूर्वी उदबत्ती लावतात किंवा काही जण सुगंधी अत्तर फवारतात. सुगंधामुळे मनाला मोहकता येते. मन प्रसन्न राहते. असे अनेक उपाय साधना करताना योजले जातात. हेतू एकच असतो की मन स्थिर राहावे. मन चंचल होऊ नये. पण मन भरकटते म्हणून साधना सोडून देणे योग्य नाही. आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. गुरूमंत्रावर मन स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. हळूहळू साधनेने हे शक्य होते. फक्त यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment