मऱ्हाठियेचां नगरीं
मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी । हों देई या जगा ।।
सध्या मराठी भाषा वापराचा आग्रह धरला जात आहे. कदाचित अशा व्यक्तींना मराठी भाषा लुप्त पावते की काय याची भीती वाटत असावी. जागतिकीकरणामुळे अनेक प्रांतातील लोक महाराष्ट्रात आले, तसे महाराष्ट्रातील लोकही परप्रांतात गेले. पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. कारण मराठी माणसाला घर सुटत नाही. महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याची त्याच्या मनाची तयारी नाही. यामुळे मराठी माणसाचे स्थलांतराचे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात सध्या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये लोक मराठी ऐवजी हिंदीच अधिक बोलतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. परप्रांतीयांच्या खिचडीने हिंदीचा वापर वाढत आहे. मराठी हळूहळू मागे पडत आहे. कदाचित यामुळे मराठी लुप्त होईल की काय अशी चिंता व्यक्त केली जात असावी. पण खरे पाहता कोणत्याही भाषेचा प्रभाव आणि वापर हा त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. चांगल्या साहित्याच्या निर्मितीने साहजिकच प्रभाव वाढतो. भाषेची लोकप्रियताही वाढते. वापरही वाढतो. मराठी मागे पडत आहे कारण यामध्ये तशा तोडीच्या साहित्याची निर्मिती केली जात नाही, हे परखड सत्य आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रथांने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. भाषेचा वापर कमी झाल्याचे पाहून भीतीने इतरांना त्रास देणे ही मराठी संस्कृती निश्चितच नाही. याचे राजकारण करणे हे यापेक्षाही वाईट. मराठी भाषा लुप्त होईल अशी चिंता करणाऱ्यांनी लोकांची वाचनाची आवड वाढेल अशा उत्तम दर्जाच्या साहित्याची निर्
मिती करावी. अमरत्व प्राप्त झालेली भाषा लुप्त होईल ही चिंता करणे व्यर्थ आहे. मराठी भाषा अमर आहे. मनाला चिरंतन स्फूर्ती देणारी भाषा आहे. हे या भाषेचे वैशिष्ठ जपायला हवे.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment