यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।।
संतांकडे अनेकजण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो. तर कोण विविध कामे मिळावीत या आशेने जात असतो. सद्गुरुंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात. समस्या सुटतात असा त्यांचा समज असतो. सद्गुरुंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्वास वाढतो. सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्या ही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायचा याबाबत मागदर्शनही करीत असतात. पण सद्गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्ती दृढ व्हावी हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल हे सद्गुरुंना माहीत असते. पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो. अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्गुरुंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्गुरुंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात हे समजून घ्यायलाच हवे. सद्गुरुंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्ययुक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्गुरू समजतात. जे भक्त सद्गुरूंना आपला आत्मभाव देतात. त्यांनाच सद्गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. यासाठी सद्गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्गुरुंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्
गुरू आहेत.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment