कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।।
फळाची आशा न ठेवता कर्म करायला हवे. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि संस्कृतीमध्ये हे विचार पटणे जरा कठीणच वाटते. कारण सध्याच्या काळात कोणतेही काम हे फळाची अपेक्षा ठेवूनच केले जाते. पगारवाढ मिळावी. पदोन्नती व्हावी. वरचे पद मिळावे. ही अपेक्षा ठेवूनच आपण काम करत असतो. देशातील कामाच्या अनुभवावर परदेशात मोठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी अशा अनेक फळांची अपेक्षा असते. यासाठीच आपण कर्म करत असतो. अधिक नफा मिळावा या हेतूने व्यापारी काम करत असतो. सध्याच्या काळात तरी सर्वत्र हेच सुरू आहे. फळाच्या आशेनेच प्रगती होत असल्याचे अनेकजण मानतात. यामुळे नव्यापिढीला फलत्याग हा विचार रुजणे जरा कठीण वाटते. पण फळाचा त्याग करूनच कर्म करायला हवे. तसे पाहता ही त्यागी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. ज्यांच्यामध्ये ही त्यागी वृत्ती नसते, तो कर्मातून योग्य लाभ मिळाला नाहीतर निराश होतो. यातून तो भरकटतो. आत्महत्या अशा निराशेतूनच होत आहेत. पगारवाढ नाही, योग्य पैसा मिळत नाही, उत्पन्नात घट झाली, मोठा तोटा झाला, पदोन्नती मिळाली नाही. अशा कारणाने निराशा येते. मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात. यातून नैराश्य येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तर फलत्याग हा सोपा मार्ग आहे. फलत्यागातूनच शांती, समाधान मिळते. आध्यात्मिक साधना करतानाही फळाची आशा ठेवू नये. साधना करत राहावे. यातूनच पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत करता येते.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment