नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।।
शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्यवेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे. पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते. अध्यात्मातही तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले की त्यासाठी असणारे नियम हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरूमंत्राची) पेरणी होणे आवश्यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील. पेरलेल्या गुरूमंत्राला साधनेचे खत पाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment