Thursday, October 14, 2010

श्रीचरण

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरुंचे ।।

इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत उभी राहू शकते. अन्यथा कोसळते. मजबूत पायामुळे इमारतीला स्थैर्य प्राप्त होते. अध्यात्माचा पायाही भक्कम असावा लागतो. तरच पुढची प्रगती साधता येते. यासाठी सद्‌गुरू चरणी नतमस्तक होणे गरजेचे आहे. याचाच अर्थ मनातील अहंकार, मीपणा काढून टाकणे असा आहे. अहंकार, क्रोध, लोभ मनात असतील तर अध्यात्माच्या प्रगतीचा पाया खचतो. नुसते सद्‌गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले म्हणजे झाले असे नाही. तर यामागची भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे. आत्मज्ञान प्रातीसाठीच्या पायऱ्या चढताना अहंकार, लोभ, मीपणा, क्रोध यांचा त्याग केला तरच पुढे प्रगती साधता येते. अन्यथा पाया कमकुवत झाल्याने प्रगतीचा जीन कोसळतो. अनेक विठ्ठल मंदिरात तसेच आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर मंदिरात विना घेऊन नामस्मरण करण्याची प्रथा आहे. हा विना दुसऱ्याकडून घेताना त्याच्या प्रथम पाया पडावे लागते. ही पद्धत आहे. मग एखाद्या लहान मुलाकडूनही विना घेताना त्याच्या पाया पडावे लागते. हा लहान, हा मोठा असा भेदभाव येथे नाही. येथे उच्च नीच हा भावही नाही. गरीब श्रीमंत असाही भेदभाव येथे नाही. यातून समानता येथे नांदावी हा उद्देश आहे. सर्वांना समान हक्क आहे. सद्‌गुरुंच्या ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो, हा संदेश यातून द्यायचा आहे. पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्‌गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. सध्या अनेक पुस्तकी पंडित गुरू आहेत. पण ते आत्मज्ञानी असतील, तरच ते खरे गुरू अन्यथा ते केवळ पंडित आहेत. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्मरूपी गुरूंचे स्मरण सतत करायला हवे. सर्व विद्या त्यांच्यात एकवटलेल्या असतात. अशा या सद्‌गुरूंच्या चरणी लीन व्हावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment