क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जें निरूतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ।।
शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे देहाला क्षेत्र म्हटले जाते. या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे समजावे. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात आत्मा आला आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा देह हा पंचमहाभूतापासून बनला आहे. फक्त प्रत्येकाच्या देहाची रचना वेगवेगळी आहे. कुणाचा देह गोरा आहे तर कुणाचा काळा आहे. कोण दिसायला कुरूप आहे. तर कोण दिसायला अति सुंदर असते. हे सर्व बाह्य रंग आहेत. पण या देहात असणारा आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. तो एक आहे. आत्मा हा अमर आहे. देह नाशवंत आहे. वयोमानानुसार देहाची स्थिती बदलते. पण आत्मा बदलत नाही. जन्माच्यावेळी तो देहात येतो. मृत्यूवेळी तो देहातून मुक्त होतो. आत्माचे हे ज्ञान ज्याला अवगत झाले तो आत्मज्ञानी. नव्या युगात अनेक शोध लागले आहेत. पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा. हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे. हे देवत्व प्रत्येक सजिवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो. आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे. हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत. सर्वांचा हेतू एकच आहे. फक्त प्रत्येक धर्माच्या रीती वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या आहेत. तरी शेवटी त्या एकाच ठिकाणी जातात. आत्मज्ञानी होणे हाच सर्वांचा हेतू आहे.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment