Sunday, July 7, 2019

आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज



भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्‌गुरू असे जोडला । किरीटीसी ।।334।। अध्याय 10 वा

अर्थ - प्रल्हादानें माझा नारायण सर्व पदार्थांत व्पाप्त आहे असे हिरण्यकश्‍यपूस सांगितल्याकारणानें तो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्‌गुरू लाभला होता.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते, पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे, हा प्रश्‍न पडतो.तसे दंतकथा आणि वास्तव यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या, दंतकथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल, की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते. कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेका इतक्‍या उंचीवर कसा नेला गेला असेल? असे प्रश्‍न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्या काळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्‍य कसे झाले? याचाच अर्थ, त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले. प्रल्हादावर विषाचा परिणाम झाला नाही. हे कसे शक्‍य आहे? उपचारही केले गेले नाहीत. मग तो इतके भयंकर विष पचवू कसा शकला, हा प्रश्‍न सहजच आपल्या मनात डोकावतो; पण साधनेने हे शक्‍य आहे. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही, हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



No comments:

Post a Comment