Monday, July 15, 2019

तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।




विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. 

- राजेंद्र घोरपडे
तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।। 767 ।। अध्याय 11 वा

अर्थ - तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्‍वरूप दाखविलें ते शंकरालासुद्धा अनेक तपें केली तरी प्राप्त होत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन घडविले. अनेक तपे करूनही शंकरालाही हे विश्‍वरूप प्राप्त होत नाही. यातून असे स्पष्ट होते की, विश्‍वाचे आर्त जाणण्यासाठी योगमार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सहज व सोपा मार्ग आहे. यामध्ये कोणतेही कष्ट पडत नाहीत. अगदी सहजपणे हे साध्य होते. संसाराचा त्याग करावा लागत नाही. सध्याच्या बदलत्या युगातही हा मार्ग उपयोगी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. लोकांध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे, पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे. अध्यात्माची वाट चुकलेले आहेत. भक्ती म्हणजे काय, हेच ते विसरले आहेत. चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत. अध्यात्माच्या मूळ उद्देशा पासून ते दूर चालले आहेत. सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते. अशा या परिस्थितीत विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. केवळ भक्तीने हे विश्‍वरूप दर्शन सहज शक्‍य आहे. यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment