Monday, July 22, 2019

आनंदाचा अखंड झरा


वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते.
जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनव्रत आनंदे । वर्षतिये ।। 1।। अध्याय 12 वा

अर्थ - तूं शुद्ध आहेस, तूं उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टि करणारी आहेस. गुरूकृपा दृष्टिरूपी माते, तुझा जयजयकार असतो.

सद्‌गुरूंचे अंतःकरण शुद्ध आहे. ते उदार आहेत. गुरुकृपेने त्यांच्यातून अखंड आनंदाचा झरा ओसंडून वाहत आहे. अशा या सद्‌गुरूंना माझा नमस्कार. सद्‌गुरूंच्या कृपाशीर्वादाने आत्मज्ञान प्राप्तीसाठीची ओढ वाढत आहे. कारण त्यांच्या सहवासात आल्यानंतर मनातील मरगळ दूर होते. त्यांच्या प्रेमाने, त्यांच्यातून ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या झऱ्याने मनाला एक वेगळीच स्फूर्ती चढते. शरीरात तेज संचारते. आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भेटीला गेल्यानंतर दर्शनासाठी नेहमीच मोठी रांग असते. तेव्हा इतका वेळ त्या रांगेत आपण उभे राहू शकू का? असा प्रश्‍न कधीच पडत नाही. पाय दुखतील का? याचीही चिंता वाटत नाही. संजीवन समाधीच्या दर्शनाच्या ओढीने हा थकवा दूर होतो. कारण सद्‌गुरूंच्या सहवासात अखंड  आनंदाचा झरा वाहत असतो. हीच तर खरी अनुभूती आहे. मोटारगाडीत इंधन असेल तरच ती धावते. त्यातील इंधन संपणार नाही, मोटारगाडी बंद पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. यासाठी ठराविक कालावधीने सतत इंधनाची टाकी भरावी लागते. तसे अनेक भक्तजन या देहाचा गाडा अखंड कार्यरत राहण्यासाठी ठराविक कालावधीने आळंदीला जातात. गाडीला जसे इंधन लागते तसे या भक्तांना सद्‌गुरूंचा सहवास लागतो. त्यांच्या सहवासात या भक्तांच्या देहाच्या गाड्याला इंधन मिळते. आनंदाच्या डोहातून हे इंधन त्यांना मिळते. याने त्यांना नवी स्फूर्ती मिळते. कामाला नवा उत्साह येतो. काम करण्याचा हुरूप वाढतो. यासाठी काही ठराविक कालावधीने ते आळंदीच्या वाऱ्या करतात. हीच त्यांची भक्ती आहे. श्रद्धा आहे. श्री ज्ञानेश्‍वरीच्या नियमित वाचनातून आत्मज्ञानाची ओढ वाढत राहते. मनाला आनंद मिळून साधनेला स्फूर्ती मिळते. पंढरीची वारीही याच साठी केली जाते. वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते. या गोडीने अध्यात्माची आवड हळूहळू वाढते. श्री ज्ञानेश्‍वरी वाचनाची गोडी लागते. सद्‌गुरूंचे प्रे वाढते. मग द्वैत आपोआपच दूर होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment