Wednesday, July 10, 2019

कृषी तंत्रज्ञान आलं दारी..... जेंव्हा कृषी अधिकारी येती बांधावरी …

वरुणराजाच्या कृपेने शाहुवाडी तालुक्याला आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आणि बळीराजाच्या कामाला वेग आला....शिवारात शेतकरी बांधवांची लगबग सुरु झाली..... अन भात रोप लावणीला चांगलीच गती आली.....अन अशातच शिवारात बळीराजाच्या मदतीला कृषि विभागाची फौज धावून आली......


स्थळ आंबार्डे तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांत पांडुरंग पाटील (आप्पा पाटील) यांच्या शेतावर कोकण कृषि विद्यापिठाचे सुधारित ‘चारसूत्री भात लागवड’ प्रात्यक्षिकाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, शाहुवाडी यांचेकडून करण्यात आले. चारसूत्री पद्धतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री स्वप्नील पाटील यांचेकडून करण्यात आले.  यामध्ये हिरवळीचे खत म्हणून  गिरीपुष्पाचा वापर, रोप लागणीतील अंतर २५ सेमी × १५ सेमी राखण्याच्या उद्देश्याने लाईन दोरीवर रोप लागण तसेच युरिया ब्रिकेटचा वापर करण्यात आला. या वेळी स्वतः कृषी अधिकाऱ्यांनी पावसाची तमा न बाळगता  गुडघाभर चिखलात उतरून  चार सुत्री पद्धतीने रोप लावण करून दाखवली.  त्याच बरोबर ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अंतर्गत कृषि यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना दिलेला पॉवर टीलर कृषी अधिकारी श्री अतुल जाधव यांनी स्वतः चालवत चिखलणीसाठी  होणारा वापर पाहून योजना सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री जयसिंग देसाई यांनी विविध योजनांची महिती दिली. श्री संदीप शेळक़े यांनी भातावरील किड व रोग व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले तर श्री गिरीगोसावी यांनी भात पिकातील तण नियंत्रनासाठी उपाय सांगितले.

चार सूत्री भात लागवड करताना ‘लर्निंग बाय डूईंग’ या विस्तार शिक्षणाच्या तत्वाचा अनुभव शेतकऱ्यांना आला. चार सूत्री भात लागवड तंत्रज्ञानाबद्दल  माहिती मिळाल्याने व शंकांचे  समाधान झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे आभार मानले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री. स्वप्नील पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री. जयसिंग देसाई, श्री. अतुल जाधव, श्री. संदीप शेळके व श्री. नामदेव गिरीगोसावी यांनी केले. तसेच सर्व  शेतकऱ्यांनी  सुधारित चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड  करण्याचे आवाहन केले.

भविष्यात अशा प्रकारचे शेताच्या बांधावर येवून प्रात्यक्षिकांद्वारे अनमोल मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा व्यक्त करत प्रगतीशील शेतकरी श्री. सुर्यकांत पाटील यांनी आभार मानत प्रात्यक्षिकाचा समारोप केला.

(शब्दांकन – प्रा. डॉ. सौ. आर. एस. शेळके )

No comments:

Post a Comment