Thursday, July 11, 2019

कैसें अनुग्रहाचे करणे







 
संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा.

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापुनि घातले ।। 230।। अध्याय 11 वा

अर्थ - प्रभुच्या कृपेची करणी कशी अद्‌भुत आहे पाहा अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे हे सर्वच भगवंतानी व्यापून टाकले.

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्‌गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्‌गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला, असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरुमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. गुरूविन कोण दाखवील वाट असे हे यासाठीच म्हटले गेले आहे ते यासाठीच. गुरूंच्या कृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो; पण सध्याच्या युगात आत्मज्ञानी गुरू आहेत कोठे? नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा. मनकवडा असायला हवा. असे संतच योग्य मार्ग दाखवू शकतात. अशा संतांचे मार्गदर्शन, अनुग्रह घ्यायचा असतो, पण आजकाल असे संत विरळ झाले आहेत. नव्या पिढीला यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेनासे झाले आहे. म्हणून साधना सोडायची नाही. कारण संत हे अमर आहेत. त्यांची समाधीही अमर आहे. संजीवन आहे. ते भक्तांना मार्ग दाखवत राहतात. अशा संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा. असे संतच योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. शिष्याला आत्मज्ञानी करू शकतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment