Monday, July 1, 2019

जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।


फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे.
- राजेंद्र घोरपडे
जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ।। 118 ।। अध्याय 10 वा

अर्थ - जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावें. हा माझा भक्तियोग आहे असे निश्‍चित समज.

व्यक्ती तितक्‍या प्रकृती. दोन जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात सुद्धा बराच फरक असतो. प्रत्येक पिकाच्या अनेक जाती आहेत, पण त्या प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. पिकात उपजलेले धान्य किंवा एकाच झाडाला लागलेली फळे एकसारखी नसतात. प्रत्येक फळाच्या चवीत थोडाफार तरी फरक असतोच. काही नासके असतात. काही कडवट असतात, तर काही अति गोड असतात. काहींना तर चवच नसते; पण प्रत्येक शेतकरी चांगली फळे लागतील, याचाच प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अन्नधान्याची, फळांची मागणी वाढतीच राहणार आहे. यासाठी उत्पादनात वाढ कशी होईल, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर धान्याची प्रत कशी सुधारेल, त्याची गोडी, त्याचा आकार आदीचाही प्रयत्न केला जात आहे. नुसते दिसायला चांगले असून चालत नाही. ज्याला गोडी चांगली आहे त्यालाच बाजारात अधिक मागणी असते. त्यालाच चांगला भाव मिळतो. फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे. सध्याचा काळ बदलला आहे, असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत, असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही, असेही सांगितले जाते; पण खरे पाहता चांगल्या गोष्टीलाच टिकाऊपणा असतो. तो एकदा डावलला जाईल, दोनदा डावलला जाईल, पण तिसऱ्यांदा त्याचीच गरज वाटू लागेल. एखादा दुष्ट-दुर्जन जरी आपणास भेटला तरी त्याच्यात काही ना काही तरी चांगल्या गोष्टी निश्‍चितच असतात. त्याच्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सत्‌ार्गाचा, चांगल्या गोष्टींचा ध्यास सतत करायला हवा. कारण जो चांगला आहे, सत्याचा पुरस्कार करणारा आहे, तोच या जीवनात अमर होतो.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


2 comments:

  1. खूप सुंदर विश्लेषण केले आहे, घोरपडे साहेब !

    ReplyDelete
  2. Example chan dilet gahan vishay chan samjavlat

    ReplyDelete