Monday, August 23, 2010

अध्यात्म

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।।


भगवंतास धर्नुधर अर्जुनाने प्रश्‍न केला. ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अध्यात्म म्हणजे काय? तसे पाहता हे प्रश्‍न सर्वच भक्तांचे असतात. प्रत्येक भक्ताला या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे प्रश्‍न प्रत्येकाला पडायलाच हवेत. त्याच्या उत्तराच्या शोधात तरी आध्यात्मिक ग्रंथाचे पारायण होईल. उत्तरे शोधण्यासाठी आपोआपच वाचन वाढेल, नंतर त्याची सवय लागेल. हळूहळू या प्रश्‍नाची उकल होते. अनुभुतीतून प्रश्‍नांची उत्तरे मिळत राहतात. यातून मनाला वाफसा येतो. अशावेळी सद्‌गुरू गुरुमंत्राची पेरणी करतात. सद्‌गुरुंचा नित्य सहवास अंतःकरणात राहातो. अगदी सहजपणे आपणाकडून साधना घडते. कष्ट पडत नाहीत. त्रास होत नाही. सतत नामस्मरणात आपण गढून जातो. दैनंदिन घडामोडीतही नित्य सद्‌गुरुंच्या सहवासाची जाणीव होते. मनाला स्थिरता येते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. यासाठी अवधान असावे लागते. तरच आध्यात्मिक प्रगती होत राहते. साधनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हळूहळू प्रगती होत राहते. अनुभूती येत राहते. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे. याची अनुभूती येते.


राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment