Thursday, August 19, 2010

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

"ऍग्रोवन'च्या सर्वेक्षणातील सूर; "नोट्‌स'वरच झाले अनेक पदवीधर

राजेंद्र घोरपडे/अनिकेत कोनकर
पुणे ः राज्यात कृषी आणि संलग्न विषयांत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची सत्रनिहाय पाठ्यपुस्तके अधिकृतरीत्या उपलब्धच नाहीत! कृषी शिक्षणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशी पुस्तके उपलब्ध होण्याची गरज विद्यार्थी व प्राध्यापकांमधून तीव्रतेने व्यक्त होत आहे. काही प्राध्यापकांनी स्वतः काही पुस्तके लिहिली आहेत, मात्र भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद अथवा चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके तयार केल्यास राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, असा सूर "ऍग्रोवन'ने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला आहे.

कृषी पदवी, तसेच संलग्न शिक्षणक्रमांसाठी असलेल्या विविध विषयांतील सर्व भाग एकाच वेळी अभ्यासाला नसतो. याची विभागणी वेगवेगळ्या सत्रांत केलेली असते. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम सारखाच असून, अकॅडेमिक कौन्सिलकडून तो ठरवला जातो. अभ्यासक्रमासोबतच तज्ज्ञांनी लिहिलेली क्रमिक पुस्तके (टेक्‍स्ट बुक्‍स) आणि संदर्भ पुस्तके (रेफरन्स बुक्‍स) यांची शिफारस केली जाते, मात्र ती केवळ एखाद्या सत्रापुरती मर्यादित नसतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी ही पुस्तके वाचणे अपेक्षित असते; मात्र काही मोजक्‍या विद्यार्थ्यांचे अपवाद वगळता ही पुस्तके वाचून, त्यातील संदर्भ घेऊन, स्वतः नोट्‌स काढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. काही वेळा प्राध्यापक स्वतः काढलेल्या नोट्‌स देतात. त्या विश्‍वासार्ह असतात; मात्र सर्वच प्राध्यापक अशा नोट्‌स देत नाहीत, त्यामुळे बहुतांश विद्यार्थी मग तयार असलेल्या नोट्‌सचा मार्ग अवलंबतात. त्या नोट्‌स नेमक्‍या कोणी काढलेल्या आहेत, कधीच्या आहेत, त्यातील संदर्भ नेमके कशातील आहेत याची पक्की माहिती नसते, मात्र संदर्भ पुस्तके, तसेच चार-पाच टेक्‍स्ट बुक्‍समधून अभ्यासक्रमातील नेमका विषय शोधण्यात होणारा गोंधळ, त्यासाठी संयमाने घालवावा लागणारा वेळ आणि त्यासाठीचा कंटाळा, काही वेळा पुरेशा पुस्तकांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे ही पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळणे आवश्‍यक आहे, ते प्रभावीपणे मिळत नाही. मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. राज्यातील बहुतांश कृषी महाविद्यालयांमध्ये हे चित्र पाहायला मिळते.

सत्रनिहाय पाठ्यपुस्तके ठरतील उपयुक्त
कृषी आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक सत्राच्या प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार केले तर ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल. या पुस्तकांतील माहिती संबंधित विषयाच्या शिफारशीत टेक्‍स्ट बुक्‍समधून एकत्रित केलेली असेल आणि त्याची सोप्या भाषेत, सुलभ अशी मांडणी केलेली असेल. विषयानुरूप अधिक माहिती, संदर्भपुस्तके, टेक्‍स्ट बुक्‍सची नावेही त्यात दिलेली असतील. राज्यातील चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके विकसित केल्यास दर्जेदार आणि खात्रीशीर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विशेष निधीतून ही पुस्तके विकसित केल्यास विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किमतींत उपलब्ध होऊ शकतील. कृषी शिक्षण घेऊन सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनीही अशी पुस्तके आवश्‍यक असल्याचे मत मांडले आहे.
..........
विविध मते..

अशी पुस्तके विद्यार्थी व प्राध्यापकांसाठीही मदतीचे होईल, त्यात नव्या अभ्यासक्रमानुसार टीचिंग शेड्यूल्सही दिल्यास परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल. प्रश्‍नपेढी, बहुपर्यायी प्रश्‍नही दिल्यास विद्यापीठाच्या परीक्षेसोबतच स्पर्धापरीक्षेसाठीही उपयुक्त होईल. अशा पुस्तकांमुळे, कोणत्याही विद्यापीठातला पेपर आला, तरी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, प्राध्यापक, विस्तार शिक्षण, कृषी महाविद्यालय, दापोली
.................
ही संकल्पना चांगली आहे. प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार करून, त्यामध्ये विषयाची सत्रनिहाय विभागणीही करता येऊ शकेल, जेणेकरून सर्व विषयांची अशी पुस्तके घेतली, की चारही वर्षे विद्यार्थ्यांना ती उपयुक्‍त ठरू शकतील.
- अजय राणे, सहायक प्राध्यापक, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली
..........
"पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचण्याचे प्रमाण 65-70 टक्केच'
आमच्या ग्रंथालयात साठ हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यामध्ये 65 ते 70 टक्के टेक्‍स्ट बुक्‍स असून, 30 टक्के संदर्भ पुस्तके आहेत. त्याशिवाय विविध प्रकारची इयरबुक्‍स, डिक्‍शनरी, विज्ञानपत्रिका, कृषिविषयक मासिके, दैनिके आणि अन्य विषयांच्या पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके
वाचण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्केच आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये मात्र ते 100 टक्के आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले वाचनाचे प्रमाण आणखी वाढण्याची गरज आहे. पुस्तके वापरण्याकडे अधिकाधिक विद्यार्थी आकृष्ट होण्याकरिता आम्ही काही उपक्रम हाती घेतले आहेत. नव्याने आलेल्या विज्ञानपत्रिकांच्या अनुक्रमणिकांची झेरॉक्‍स काढून आम्ही ती संबंधित विषयाच्या विभागामध्ये नोटीसबोर्डवर चिकटवण्यासाठी पाठवतो, जेणेकरून संबंधित
विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा संदर्भ मिळतो आणि ते मूळ विज्ञानपत्रिका वाचण्यासाठी ग्रंथालयात येऊ शकतात, तसेच नवी विकत घेतलेली पुस्तके आम्ही ग्रंथालयात दर्शनी भागात डिस्प्ले करतो, त्यामुळे नव्या पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना कळते. विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील संदर्भसाहित्याचा लाभ होण्यासाठी सुसज्ज 40 संगणकांचा विभाग सुरू करण्यात आला आहे, तसेच जुन्या विज्ञानपत्रिका आणि अन्य काही संदर्भसाहित्य सीडीच्या स्वरूपातही उपलब्ध आहे, त्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात.
- किशोर पाटील, ग्रंथपाल, कृषी महाविद्यालय, पुणे
.............
ऍकॅडमिक कौन्सिलने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तकांची (टेक्‍स्ट बुक्‍स) शिफारस केलेली असते. ही पुस्तके कृषी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात
या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही पुस्तके सत्रनिहाय नसून, त्यामध्ये संबंधित विषयाची विस्तृत माहिती असते. विद्यापीठांनी पुढाकार घेतल्यास सत्रनिहाय
पुस्तकेही काढता येऊ शकतात. पुस्तकनिर्मितीसाठी आयसीएआरकडून निधीही उपलब्ध होत असतो.
- डॉ. भीमराव उल्मेक, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पुणे
...................
सध्या काही प्राध्यापक स्वतःहून अशी पुस्तके लिहून प्रकाशित करीत आहेत. त्याचा वापरही मुले करत आहेत, मात्र अजून हा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही. या पुस्तकांच्या किमती विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या नसतात, त्यापेक्षा पुस्तके किंवा नोट्‌सच्या झेरॉक्‍स करून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विद्यापीठ पातळीवर अशी पुस्तके तयार झाली तर उपयुक्त ठरू शकेल.
- डॉ. हरिहर कौसडीकर, सहायक प्राध्यापक,
ृमृद्विज्ञान व कृषी रसायन विभाग,
कृषी विद्यापीठ, परभणी
....................
विषयांची सत्रनिहाय पुस्तके आवश्‍यकच आहेत, अशी पुस्तके लिहिण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांची निवड करावी. या पुस्तकांमध्ये ग्राफिक्‍स, आकृत्या आदींचा वापर प्रभावीपणे करायला हवा. विद्यार्थ्यांना थेट समजतील अशी उदाहरणे देऊन विषयांची सुलभ मांडणी करायला हवी. अशी पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तर उपयुक्त ठरतीलच, शिवाय प्राध्यापकांसाठीही एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
- डॉ. रामचंद्र साबळे, माजी प्रमुख, हवामानशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
................
ना नफा, ना तोटा तत्त्वावर उपक्रम
अभ्यासक्रमात बदल होत असल्याने नव्या पुस्तकांची गरज आहे. ऍग्रोनॉमी विषयाची काही सत्रांची पुस्तके आम्ही तयार करून ना नफा ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांसाठीही याचा फायदा होऊ शकतो.
- डॉ. अशोक पिसाळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.
......................
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हवा
पुस्तके वापरण्याचे व वाचनालयात जाऊन स्वतः नोट्‌स काढण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यात सुधारणा व्हायला हवी. शासकीय महाविद्यालयांमध्ये पुस्तकांची उपलब्धता अधिक आहे, मात्र आम्हीही पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्याला योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे.
डॉ. दिनकरराव रामचंद्र थोरात, प्राचार्य, कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु., ता. कऱ्हाड, जि. सातारा
..................
बहुतांश विद्यार्थी तयार नोट्‌स वाचूनच अभ्यास करतात. सत्रनिहाय पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यास खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकेल.
- पुष्कर देवल, चतुर्थ वर्ष, बी.एस्सी. ऍग्री., कृषी महाविद्यालय, दापोली.
....................
एकाच विषयासाठी सहा-सात पुस्तके शिफारशीत केलेली असतात. आमचा अभ्यासक्रम नवा असल्याने काही विषयांची पुस्तके उपलब्ध होत नाहीत, मग उपलब्ध पुस्तके अन्‌ नोट्‌सच्या झेरॉक्‍स काढून वाचल्या जातात. विषयांची सत्रनिहाय पुस्तके उपलब्ध झाल्यास उपयुक्त ठरेल.
- आशीष पित्रे, चतुर्थ वर्ष, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली.
.........
पुस्तके फायदेशीर
उपलब्ध नोट्‌समधून विषयाची सखोल माहिती मिळत नाही, मात्र काही प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आम्हाला फायदा होत आहे, त्यामुळे सर्व विषयांची अशी पुस्तके प्रकाशित झाल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
- हर्षद देशमुख, बी.एस्सी. (उद्यानविद्या), तृतीय वर्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
.....................
पशुवैद्यकीय पदवीसाठी शिफारस केलेली 70 टक्के पुस्तके परदेशी लेखकांची असून, उर्वरित भारतीय लेखकांची आहेत. काही जर्नल्सचाही वापर पुस्तक म्हणून करावा लागतो; मात्र सत्रापुरतीच पुस्तके उपलब्ध केल्यास संबंधित विषयाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात मर्यादा येतील.
- डॉ. नितीन मार्कंडेय, प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी
....................................
क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक
पशुवैद्यकीय शिक्षणातील क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक आहे. आपल्याकडे एक किंवा दोन तज्ज्ञांनी मिळून लिहिलेली क्रमिक पुस्तके अभ्यासक्रमामध्ये आहेत, परंतु परदेशात एकाच विषयातील 20 ते 25 तज्ज्ञांच्या संशोधनाचा आधार घेत क्रमिक पुस्तक तयार केलेले असते. त्यामुळे विद्यार्थांना एकाच विषयातील विविध स्तरांवरील संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी अभ्यासण्यास मिळते.
- डॉ. रामनाथ सडेकर, पशुतज्ज्ञ
.........................................
पुस्तकांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
फोर्थ डिन्स कमिटी 2007-08 यांच्या शिफारशीनुसार तयार झालेला बी. एस्सी. (कृषी) पदवीच्या नवीन अभ्यासक्रमाची 14 क्रमिक पुस्तके आम्ही
प्रकाशित केली आहेत. विद्यार्थ्यांचा यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पुस्तकामध्ये
अभ्यासक्रमानुसार आवश्‍यक रंगीत छायाचित्रे, आकृत्या आदींची माहिती समाविष्ट करण्यात आल्याने विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही त्यास पसंती दर्शविली आहे.
- राजाभाऊ आहिरे पाटील, श्री राजलक्ष्मी प्रकाशन, औरंगाबाद
...................

No comments:

Post a Comment