Monday, August 9, 2010

वाफसा

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।।
शेतात बी पेरण्यासाठी जमिनीत वाफसा असावा लागतो. पावसाळ्यात पेरणी करताना जमिनीतील पाण्याचा निचरा होऊन जमीन वाफश्‍यावर येणे आवश्‍यक आहे. वाफसा येतो तेव्हाच शेतकरी पेरणी करतात. तसेच खते, तणनाशके, कीडनाशके यांचा वापर करतानाही जमिनीत वाफसा असणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरुकडून सतत प्रेमाचा, ज्ञानाचा वर्षाव होत असतो. भक्त या प्रेमाच्या रसात डुंबून जातो. पण सद्‌गुरुंचा अनुग्रह होण्यासाठी भक्ताचे मन वाफशावर येणे आवश्‍यक असते. मनाचा वाफसा तयार झाला की, सद्‌गुरू त्यामध्ये गुरुमंत्राची पेरणी करतात. ते बीज वाया जाऊ नये याची काळजी घेतात. बी जमिनीत वाढते. यासाठी शेतकरी त्याच्या वाढीच्या योग्य कालावधीत खते देतात. पिकात वाढलेली तणे काढतात. सद्‌गुरू भक्ताला योग्य वेळी उपदेश करून त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी त्याला प्रोत्साहित करतात. यामुळे भक्ताला अध्यात्माची गोडी लागते व त्याची प्रगती होते. काही कालावधीने हे बीज फुलोऱ्यावर येते. त्यालाही आत्मज्ञानाची फुले लागतात. ही फुले इतरांच्यावर भक्तीचा रस ओततात. अशी ही भक्तीची परंपरा आपल्या देशात अनादी कालापासून अखंड सुरू आहे.

No comments:

Post a Comment