Monday, September 27, 2010

अहंकार

तसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकार लोपीं अवधारी । द्वैत जाय ।।

अहंकाराने अनेक मोठमोठ्या व्यक्तींना पराभव पत्कारावा लागला आहे. कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो. कोणाला पैशाचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो. अहंकाराने अनेकांना दुःख पोहोचते. पण अहंकारी व्यक्तींना याची साधी कल्पनाही होत नाही. पैशाचा अहंकार खूपच वाईट. मुळात पैसा हे द्रव्य नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. अहंकाराने अंध झालेल्या व्यक्तींना याची जाणीव नसते. पैसा आहे तोपर्यंत अशा व्यक्तींना मानसन्मान मिळतो. मानसन्मान पैशाने विकत घेता येतो. याचाही अहंकार अनेकांना असतो. आजकाल पुरस्कारही पैशाने विकत मिळत आहेत. पण अशा विकल्या जाणाऱ्या पुरस्कारांना फारसे समाजात कोणी मान देत नाही याची जाणीव त्यांना नसते. पैसा संपला की सर्व संपते. सर्व मानसन्मान मग गळून पडतात. तेव्हा त्यांना भगवंताची आठवण होते.
काहींना माझ्यासारखे दुसरा कोणी ज्ञानी या जगात नाही. असा अहंकार असतो. पण खऱ्या ज्ञानाची त्यांना ओळखच नसते. असे विद्वान जेव्हा एखाद्या आत्मज्ञानाच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचा अहंकार सरतो. आपल्यापेक्षा कोणीतरी ज्ञानी आहे. आपल्या मनातले ओळखणारा मनकवडा कोणीतरी आहे. याची जाणीव त्यांना होते. तेव्हा असे विद्वान आत्मज्ञानी संतांच्या चरणी लीन होतात. असे लीन झालेले विद्वान, अहंकाराचा लोप पावलेले विद्वान मग सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने आत्मज्ञानी होतात.
सद्‌गुरुंच्या साक्षात्काराने अनेकांचा अहंकार गळून पडतो. साक्षात्कार म्हणजे काय? आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार. मनुष्य अनुभवातूनच शिकत आला आहे. नोकरीमध्येही अनुभवाला प्राधान्य दिले जाते. किती वर्षांचा अनुभव तुम्हाला आहे. असे प्रथम विचारले जाते. त्यानुसार तुमची पात्रता ठरवली जाते. आत्मज्ञानाचे अनुभव सद्‌गुरू सतत देत राहतात. यातून ते साधकाची आध्यात्मिक प्रगती साधतात. हळूहळू साधकातील अहंकार मीपणा लोप पावतो व साधकही आत्मज्ञानी होतो.


राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment