Tuesday, September 7, 2010

संपत्ती आणि दया

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।।

अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात. पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्व सामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात. इतकी मगरूरी त्यांच्यात असते. कमावलेला पैसा गरिबांना दान करण्यास त्यांना जड जाते. अहो इतकेच काय पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय नाही होय करतात. पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात पण प्रेम, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या उर्मीने तो इतका अंध झालेला असतो की घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो. पण पैशाची ही गुर्मी योग्य नाही. कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. पण घरात लक्ष्मी शिवाय शांती नाही. हे ही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुख शांती समाधान घेऊन येते. पण ते टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे. आपल्या कडील पैशाने दहा गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्‍चितच मदतीला धावतील यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे. अशा व्यक्ती कडे भगवंत वसती करतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment