Wednesday, September 1, 2010

अमरत्वाचे सिंहासन

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।।

सद्‌गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो. पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानात बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे. असे सांगितले जाते. पण दुसरीकडे दारिद्र रेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे? जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो तोच खरा समाजसेवक असतो. त्यांचे नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते. म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी बनविणारे राज्यकर्ते हवेत. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसविणारेच खरे सद्‌गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment