Saturday, September 4, 2010

भक्ती

तरि झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।

आत्मज्ञान प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. मनापासून केलेली भक्ती निश्‍चितच फळाला येते. योगाचा मार्ग हा कष्टदायक आहे. त्यासाठी काही जण संसाराचाही त्याग करतात. वणवण भटकतात. तरीही मनःशांती होत नाही. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाराबारा वर्षे तपश्‍चर्या करावी लागते. बरेच कष्ट पडतात. शरीराला त्रास होतो. एवढे करूनही आत्मज्ञान मिळेलच याची खात्री नाही. अनेक साधू शांतीच्या शोधात हिमालयात जाऊन साधना करतात. पण सध्या खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधात फिरणाऱ्या साधूंची संख्या कमी झाली आहे. संधी साधूच अधिक आहेत. काही साधूंना आत्मज्ञान प्राप्ती झाली तरीही त्यांचा उपयोग समाजासाठी करणारे फारच कमी आहेत. खडतर तपश्‍चर्या करून आत्मज्ञान प्राप्तीपेक्षा भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. सद्‌गुरुंच्या भक्तीत मन रमवणे सहज शक्‍य आहे. यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसारात राहूनही मुक्ती मिळवता येते. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्‍वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्‌गुरुंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे. भजन, कीतर्न हे सुद्धा भक्तीचेच मार्ग आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, पारायण हे ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. यात सद्‌गुरुंचे स्मरण होते. नुसत्या श्रवणाने सुद्धा येथे मोक्ष सिद्धी होऊ शकते. यासाठी संत सहवासात जाणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांची, गोष्टीची, उपक्रमांची सवय लावून घेणे गरजेचे आहे. यातून मन आनंदी राहते. चांगल्या गोष्टींची सवय लागायला थोडा वेळ लागतो. मनाला ते लवकर रुचत नाही. पण साधासोपा भक्तीचा मार्ग अवलंबणेच या बदलत्या युगात सोईस्कर आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment