Tuesday, December 28, 2010

अनुभूती

जय जय सर्व विसांवया । सोsहं भाव सुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।।

अनुभवाशिवाय बोलू नये असे म्हटले जाते. नोकरीमध्ये सुद्धा अनुभव पाहिला जातो व त्यानुसार तुमची पात्रता ठरविली जाते. आत्मज्ञानी संतांकडे गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्या विषयी बोलणे हे व्यर्थ आहे. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच येथे प्रगती साधता येते. आत्मज्ञानी सद्‌गुरू शिष्यांना अनुभव देतात. ते मनकवडे असतात. ते भक्तांच्या मनातील इच्छा, आकांछा जाणतात. त्यांना भूत- भविष्याचे ज्ञान असते. ते शांतीचे सागर आहेत. त्यांच्या दर्शनानेही मनाला शांती, समाधान वाटते. ते समाधिस्थ झाले, तरीही ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. अनुभव देत असतात. भक्तांचे दुःख ते दूर करत असतात. संकटकाळी मनाला त्यांचाच आधार असतो. पुरात सापडलेल्या व्यक्तीला एखादा लाकडी ओंडका मिळाला तर तो तरू शकतो. तो बुडण्यापासून वाचू शकतो. तसे सद्‌गुरू संकटकाळात लाकडी ओंडका होतात. शिष्याला संकटकाळात आधार देतात. त्यांचे जीवन तारतात. संकटात तरलेले भविष्यात फार मोठी कामगिरी करू शकतात. कारण त्यांनी दुःख पचवायला शिकलेले असते. दुःखावर मात करायला ते अनुभवलेले असतात. अनुभवामुळे भविष्यात चुका होत नाहीत. प्रगती होत राहते. वाट सापडते. वेगवेगळे मार्ग सुचतात. सद्‌गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्‌गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात. त्यांच्याजवळ आनंद ओसंडून वाहत असतो. खचलेल्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ या आनंदात आहे. सद्‌गुरू शिष्याला त्याची खरी ओळख करून देतात. मी ब्रह्म आहे याचा अनुभव ते सतत शिष्याला देत राहतात. यासाठी त्यांच्या संगतीत जाऊन तो अनुभव घ्यायला हवा. संकटकाळीच लोक देवाकडे जातात पण जे नियमित जातात त्यांना अनुभवाने देवपण प्राप्त हो
ते.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

1 comment:

  1. संकल्प हा चित्तापेक्षाही सूक्ष्म असल्याने सद्गुरूच्या केवळ संकल्पानेच शिष्याचे चित्त प्रकाशित होते.

    ReplyDelete