चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
माकड गारूडियाचे । जैसे होय ।।
सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही जवळपास संपला आहे. पुरुष प्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतेमुळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत असे अनेक प्रश्न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल तर कुटुंब व्यवस्थाही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री- पुरुष नाते संबंधात बदलत होत आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी अशी अवस्था आज संसाराची झाली आहे. चंगळवादाने अशा समस्या उद्भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्नावर चर्चाही केली जाते. पण स्त्री स्वातंत्र्यामुळे उलट त्याच्या सुरक्षेचाच प्रश्नच मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. अशाने सामाजिक शांती नष्ट झाली आहे. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्मामध्ये स्त्रियांवर टीका केली आहे. म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का गेली आहे याचा प्रथम विचार करायला हवा. टिके मागचा हेतू जाणून घ्यायला हवा. संस्कृतीला नावे ठेवण्याऐवजी टीकेवर चिंतन, मनन करायला हवे. भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. समाजात स्त्री- पुरुषांनी वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत हे त्यामध्ये सांगितले गेले आहे. हे सर्व सामाजिक शांती, समृद्धीसाठी सांगितले गेले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा.
राजेंद्र घोरपडे, पुणे
No comments:
Post a Comment