Monday, December 6, 2010

अज्ञानवेली

तया शरीर जे जालें । तें अज्ञानाचें बी विरूढलें ।
तयाचें वित्पत्तित्त्व गेलें । अज्ञानवेली ।।

ज्वारीचे बी पेरले की ज्वारीचेच पीक येते. आंब्याचे बी पेरले की आंब्याचे रोपच उगवते. तसे अज्ञानाचे बी रुचले की तेथे अज्ञानाचाच वेल उगवतो. ज्याचे आपण बी पेरतो त्याचेच रोपटे उगवते. अफूचे बी पेरल्यावर अफूच उगवणार. यासाठी शेती कशाची करायची हे आपण ठरवायचे असते. पेरणी ही आपणालाच करावी लागते. ज्ञानाची पेरणी केली की निश्‍चितच तेथे ज्ञानाचे रोपटे उगवेल. तणाचे बी पेरावे लागत नाही ते आपोआपच उगवते. तणांचा नाश केला तरी शेतात तण हे उगवतेच. असेच अज्ञानाचे आहे. अज्ञानाचे बी एकदा शेतात पडले तर त्याचा फैलाव जोरदार होतो. त्याचा समूळ नाश करावा लागतो. शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तणांचा नाश करावा लागतो. शेतातील तणे काढून टाकावी लागतात. तरच पिकाची वाढ जोमदार होते. तणे शेतीतील अन्नद्रव्ये शोषतात. तणांची वाढ जोरात होते. पण ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच जमिनीत गाढली तर ती कुजल्यानंतर त्याचे खत होते. याचा उपयोग पिकाच्या वाढीला होतो. यासाठी अज्ञान फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच गाढावे. म्हणजे ते कुजून त्याचे खत होऊन ज्ञानाचे रोप जोमात वाढेल. अज्ञान वाढू न देण्यातच ज्ञानाची प्रगती आहे. काही तणे ही परोपजीवी असतात. यामुळे मुख्य पिकाची वाढ खुंटते. अज्ञान सुद्धा एक परोपजीवी तणच आहे. यामुळे ज्ञानाची वाढ खुंटते. ज्ञानाची वाढ जोमाने होण्यासाठी अज्ञानाच्या तणाची खुरपणी ही व्हायलाच हवी. अज्ञानाचे तण न काढताच खते टाकली तर ज्ञानाच्या पिकापेक्षा अज्ञानाच्या तणांची वाढ जोमाने होईल. पुन्हा त्या शेतात ज्ञानाच्या पिकाची पेरणीही करणे शक्‍य होणार नाही. यासाठी अज्ञानाच्या तणांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment