Sunday, December 26, 2010

रसज्ञ

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैंसा ।।

सिंहगडावर मिळणारी झुणका भाकरी कधी खाल्ली आहे का? लोट्यातून दहीही मिळते. त्याची चव चाखली आहे का? याची गोडी काही औरच असते. एखाद्याच्या हातचा गुणच वेगळा असतो. प्रत्येकाला ते जमत नाही. एखाद्या ठिकाणचे पदार्थही वेगळ्याच गोडीचे असतात. सध्या धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याची चवही कशी सुधारता येईल हेही पाहिले जात आहे. पण या संकरित जाती फार काळ टिकत नाहीत. पारंपरिक जातीमध्ये जे गुण होते ते गुण या संकरित जातीत आढळत नाहीत. यासाठी धान्याच्या पारंपरिक जाती जतन करण्याची गरज आहे. पण या जातींचे उत्पादन कमी असते. यामुळे काळाच्या ओघात या जाती नष्ट होत आहेत. सध्या नव्याने अनेक संकरित जाती येत आहेत. जैवतंत्रज्ञानाने तर यामध्ये मोठी क्रांतीच केली आहे. उत्पादन वाढीचा उच्चांक गाठणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. पण या जाती खाण्यास योग्य आहेत का? याचे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात. याबाबत संशोधकातही एकमत नाही. बीटी वांगे यामुळेच चर्चेत आहे. वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी उत्पादन वाढीची गरज आहे. 2050 पर्यंत देशाच्या कृषी उत्पादनात 70 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे, म्हणून कशाही प्रकारे उत्पादन घेऊन चालणारे नाही. आरोग्याचीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. उत्पादन वाढीबरोबरच त्याची उत्तमता, प्रत, गोडी तसेच आरोग्यास लाभदायक असे गुण टिकवणे हे आव्हान संशोधकांसमोर आहे. नुसतेच भरघोस उत्पन्न घेऊन चालणार नाही. त्याने समाधान होणार नाही. त्याला गोडीही असेल तरच मागणी राहते. भरघोस उगवते, गोडीही आहे आणि शिजवलेही उत्तम जाते, मग याच्या ग्रहणाने तृप्ती ही निश्‍चितच येणार. मनाला तृप्ती आली की चेहराही तजेलदार होतो. साधनेलाही गोडी लागते. कीर्तनकारास प्रेक्षकांची साथ मिळाली तर कीर्तन सांगणाऱ्यासही जोर चढतो. गोडीने ऐकणारे असल्यावर सांगणाऱ्यासही गोडी वाटते. संगीताचेही तसेच आहे. गायकास रसिकांची दाद मिळाली तर त्यालाही स्फुरण चढते. तसे आत्मज्ञानी सद्‌गुरूंकडे ओसंडून वाहणाऱ्या या ज्ञानरसात मनमुराद डुंबणारे शिष्य भेटले तर ते ही तृप्त होऊन जातात. सद्‌गुरुंच्या ज्ञानरसाने शिष्यही तृप्त होऊन जातो. मनाची तृप्ती अनुभवतो. खाणारा आवडीने खात असेल तर भरवणाराही आवडीने भरवतो. शिष्य आवडीने खात असेल तर सद्‌गुरूही आवडी भरवतात. मग अशा शिष्याला तृप्ती का येणार नाही? मनाची स्थिरता का साधता येणार नाही? स्थिरता आली की मन आपोआप साधनेत लागते. फक्त आवड पाहिजे.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

No comments:

Post a Comment