Friday, December 24, 2010

राजहंस

तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ।।

दुधात पाणी मिसळले तर दूध पातळ होते. पण राजहंस हा असा पक्षी आहे जो त्यातील फक्त दूधच पितो व पाणी शिल्लक ठेवतो. इतके चातुर्य त्याच्याकडे आहे. आपणास आवश्‍यक ती गोष्टच तो घेतो. राजहंसाप्रमाणे आपणही या मोहमयी जगातील केवळ चांगल्या गोष्टींचे ग्रहण करायला शिकले पाहिजे. या मोहजालात न अडकता यातून योग्य काय व अयोग्य काय हे ओळखायला शिकले पाहिजे. यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. मनाच्या स्थिरतेसाठी अशी दृष्टी गरजेची आहे. साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्‍यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात. आत्मा व देह वेगवेगळे आहेत. दुधात जसे पाणी मिसळले आहे तसे देहात आत्मा आला आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे. हे जाणण्यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. देहाचा क्षणभंगूरपणा ओळखायला हवा. आत्म्याचे अमरत्व अनुभवायला हवे. आत्म्याची अनुभूती यायला हवी. सद्‌गुरू त्यांच्या अनुभवातून ही अनुभूती शिष्याला देत असतात. शिष्याने फक्त जागरूक असायला हवे. राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञानदृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस. तेच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात. तेच त्या परमपदाला पोहोचतात.

राजेंद्र घोरपडे,
संपर्क क्र. 9011087406

No comments:

Post a Comment