मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।।
साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनेमुळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे. पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोsहंच्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकीपट सर्वच मिळते असे नाही. सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. परवाच मी वाचले की नाशिकमध्ये कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून द्राक्ष उत्पादकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आणि यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेल्या एका द्राक्ष उत्पादकाच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ते म्हणाले की सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. 1985 मध्ये त्यांनी एक एकर द्राक्ष बागेच्या उत्पन्नातून दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश मुलाला कमवायचे होते. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निराशा त्याने बोलूनही दाखवली नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत.
राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406
No comments:
Post a Comment