जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची ।।
एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचे असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो. नित्य ध्यासाने त्या गोष्टीत परिपूर्णता साधता येते. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती पाहिजे. विचारात चांगुलपणा असेल आणि कामात नित्यता असेल तर, यश सुद्धा त्याच्यापुढे लोटांगण घालते. संत गोरा कुंभार यांच्या नित्य ध्यासामुळेच विठुराया त्यांची मडकी वळायचा. सद्गुरुंच्या नित्य ध्यासाने सद्गुरू मदतीला धावून येतात. कधी ते कुणाची घरकामे करतात, तर कधी ते कुणाचे दळण दळतात. तर कधी कुणाचा रथाचे सारथी होतात. सध्याच्या युगात अशा गोष्टी मनाला पटणे कठीण आहे. नव्या पिढीला या गोष्टी समजणे कठीण आहे. पण एखाद्या कामात नित्यपणा असेल तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. अपयश एकदा येईल, दोनदा येईल तिसऱ्यांदा यश निश्चितच मिळते. प्रयत्न सोडायचे नाहीत. क्रिकेटमध्ये प्रत्येक कसोटी सामन्यात फलंदाज शतक ठोकू शकत नाही. काही वेळेला तर तो सतत शून्यावरही बाद होतो. पण परिश्रमाने, प्रयत्नाने त्याच्यात सातत्य येते. नेहमी चांगल्या धावा करण्याकडे त्याचा कल राहतो. खेळाचे जसे आहे तसेच जीवनाचेही आहे. व्यवसायात रोज भरघोस उत्पन्न होईल असे नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला भाव मिळतो असे नाही. पण यासाठी शेतकऱ्याने शेती सोडून देणे किंवा व्यावसायिकाने व्यवसाय सोडून देणे योग्य नाही. चुका कशा होतात, का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सुधारता आल्या पाहिजेत. एखादी गोष्ट समजत नाही तर ती मनमोकळेपणाने सांगितली पाहिजे. दुःख व्यक्त केल्याने मन हलके होते. थोडा आधार होतो. कामातील नित्यतेमुळे खचलेल्या मनाला पुन्हा उभे करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते. सततच्या ध्यासानेच नराचा नारायण होतो.
राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406
No comments:
Post a Comment