Monday, January 24, 2011

सात्त्विक राजा

नगरेची रचावीं । जलाशयें निर्मावीं ।
महावने लावावीं । नानाविधें ।।

प्रत्येक मनुष्यात सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्याचे प्रमाण कमी अधिक असते. सात्त्विक वृत्तीत वाढ झाल्यास मनुष्याला देवत्व प्राप्त होते. शहरेच वसवावीत. जलाशये वगैरे पाण्याचे मोठे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत. हे रजोगुणाचे लक्षण आहे. धरणांचे प्रकल्प उभारताना अनेक समस्या उभ्या राहतात. याचे वाद अनेक वर्षे चालतात. यात कोणाला न्याय मिळतो. कोणाला न्याय मिळतही नाही. ज्यांनी पाण्यासाठी घरे सोडली त्यांनाच पाणी मिळत नाही ही आजची स्थिती आहे. धरणे ही व्हायला हवीत. हेही खरे आहे. पण ती बांधताना विस्थापितांनाही त्यामध्ये योग्य न्याय द्यायला हवा. पण तसे होत नाही. धरणाचा फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे. असे नियोजन करायला हवे. असे नियोजन असेल तर धरणाला विरोध होणार नाही. धरणाचा फायदा प्रत्येकाला समान मिळाला पाहिजे. पाण्याचे समान वाटप झाले तर वाद होणार नाहीत. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचा स्वार्थ त्यामध्ये अडवा येतो. प्रत्येकजण स्वतःला अधिक कसा फायदा होईल हेच त्यामध्ये पाहतो. अशाने वाद वाढतच जातात. सात्त्विक वृत्तीने कोणी काम करण्यास तयारच नाही. स्वतःच्या व्यक्तिगत फायदा पाहणाऱ्या राजकियवृत्तीमुळेच देशाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत. अन्यायामुळेच नक्षलवाद वाढत आहे. अन्यायाचा विस्फोट अशा प्रकारे होणे हे एक दुर्दैव आहे. देशांतर्गत सुरक्षा अशाने धोक्‍यात येऊ शकते. सर्वांना सम न्याय मिळाला पाहिजे. सध्या यासाठी लढा देऊन काहीही मिळत नाही. असे दिसते यामुळे हे घडत आहे. समन्यायी देण्याची वृत्तीच सरकारमध्ये नाही. मग असे प्रश्‍न उत्पन्न होणारच. असे लढे उभे राहणारच. यासाठी सरकारनेच प्रकल्पांचे नियोजन करताना समन्यायी ठेवावा. यामुळे देशात वाढणारा नक्षलवाद निश्‍चितच कमी होईल. यासाठी राज्य कारभारातच सात्वीकवृत्ती वाढीस लागायला हवी. सात्वीकवृत्तीचे राजेच आज अमर आहेत. त्यांचेच नाव होते. सर्वांना समान न्याय देणारा राजाच स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो. त्यांचे साम्राज्य टिकून राहते.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

No comments:

Post a Comment