Saturday, January 22, 2011

झोप

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।।

महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामसवृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सानिध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात. एखाद्या अधिकाऱ्याने पद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसीवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्त्यांना अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आहे. काही अधिकारी याला अपवाद असतात. पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सानिध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसीवृत्तीचे झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा करताना अशा सरकारी कारभारामुळे बाधा पोहोचते आहे. याकडे हे सरकार तरी लक्ष देते का? झोपलेल्या सरकारला जाग येईल तरी कधी? निवडून गेलेले मौनी खासदार - आमदार यांचे मौन सुटणार तरी कधी? नुसत्या शासकीय फायली इकडून तिकडे करून आयता पगार लाटण्यातच यांचे कामकाज चालते. कागदोपत्री योजनांची पूर्तता करून पैसे लाटणारे हे राज्यकर्ते कोणाच्या फायद्याचे? अशाने देशाचा विकास तरी कसा होणार? कागदावरच महासत्तेच्या गप्पा मारण्यात सर्वजण पटाईत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती खूप गंभीर आहे. तमोगुणाचे साम्राज्य पसरलेले आहे. पूर्वीच्याकाळी अनेक राजे असे होते. सत्ता भोगण्यातच त्यांचे आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐश आरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येकवर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. सरकारचे व सरकारी कार्यालयातील तामसीवृत्तीचे हे व्यसन सुटणार तरी कधी? असा हा तामसगुण केवळ त्यांच्यासाठीच नव्हेतर इतरांसाठीही हानिकारक आहे. यातून जागृती ही यायलाच हवी.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

No comments:

Post a Comment