Friday, August 27, 2010

अवधान

तरी अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।

गाडी चालवताना चालकाचे अवधान चुकले तर आपण लगेच त्याला ओरडतो. अवधान हे ठेवावेच लागते. नाहीतर अपघात होतात. आपण ज्या गोष्टी करतो त्याप्रत्येक गोष्टीत अवधान हे असावेच लागते. अवधान ढळले तर चुका होतात. साधनेत अवधानास खूप महत्त्व आहे. मनात काहीही विचार सुरू असतात पण क्रिया ही सुरूच असते. सायकल चालवताना आपल्या मनात विचार सुरू असतात त्यावेळी पायंडेल ही आपण मारत असतो. दोन्हीही क्रिया एकाच वेळी सुरू असतात. साधना करतानाही तसेच आहे. आपण साधनेला बसलेले असतो पण आपल्या मनात वेगळेच विचार घोळत असतात. पण त्यावेळी आपली साधनाही सुरू असते. श्‍वास आत घेतला जात असतो. बाहेर सोडला जात असतो. पण ही क्रिया आपल्या लक्षात येत नाही. यासाठी साधना करताना मनातील सर्व विचार सोडून द्यावे लागतात. हे एकदम शक्‍य होत नाही. कालांतराने विचार कमी होतात. पूर्वीच्या काळी अनेक साधू हिमालयात जाऊन बाराबारा वर्षे साधना करत असत. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत असत. पण तरीही त्यांचे मन स्थिर होत नसे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आपणास साधासोपा मार्ग सांगत आहेत. फक्त अवधान द्यावे इतकेच त्यांचे मागणे आहे. त्यांचे हे मागणे जो भक्त पूर्ण करू शकतो. त्यालाच आत्मसुखाचा लाभ होतो. यासाठी वणवण भटकायची गरज नाही. संसाराचा त्याग करायचीही गरज नाही. फक्त साधना करताना अवधान देणे असणे आवश्‍यक आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment