Wednesday, August 25, 2010

मनाची स्थिरता

तूं मन बुद्धी सांचेसी । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेची गा पावसी । हे माझी भाक ।।
अध्यात्माचा अभ्यास हा करायलाच हवा. साधनेतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा. चक्रांचे कार्य काय आहे, ते कसे कार्य करतात? साधनेच्या काळात आपल्या शरीरात कोणत्या क्रिया घडतात? आपणास कोणते बोध होतात? कोणती अनुभूती येते? हे जाणून घ्यायलाच हवे. साधनेत अवधानाला अधिक महत्त्व आहे. नुसतेच शांत बसून राहणे म्हणजे साधना नव्हे. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण करायला हवे. ते करताना अवधान आवश्‍यक आहे. मन भरकटते. पण मनाला स्थिर करणे आवश्‍यक आहे. साधनेच्या सुरवातीच्या काळात हे शक्‍य होत नाही. पण हळूहळू अभ्यासाने ते शक्‍य होते. मनातील विचार दूर होतात. साधनेत येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. सद्‌गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या जागी मन स्थिर होते. मनाला स्थिर ठेवणे कोणास जमले ? साधना सुरू असताना विचार येतच राहतात. पण याचा तोटा काही नाही हे ही लक्षात घ्यायला हवे. या विचारांच्या जागी मन स्थिर होते. यातून एखाद्या समस्येवर उत्तर मिळते. चिंतन, मननातूनच अनेक समस्या सुटतात. योग्य मार्ग सापडतात. साधनेचे हे फायदे आहेत. यासाठी सुरवातीच्या काळात साधनेत मन रमले नाही तरी हळूहळू त्याची गोडी लागते. मनाला स्थिरता येते. विचार संपतात. मग आत्मज्ञानाच्या पायऱ्या सहज चढल्या जातात.

राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment