Saturday, August 7, 2010

अभ्यास

इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेंनी ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाची रीती । कळले मज ।।
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास हा आवश्‍यक आहे. आजकाल राजकारणात फक्त निवडणूक लढविणे आणि ती जिंकणे याचाच अभ्यास केला जातो. विकासकामांवर फारसा भर दिला जात नाही. आपले पद खुर्ची कशी टिकवून ठेवायची यावरच भर दिला जातो. याचेच सतत चिंतन, मनन, अभ्यास केला जातो. अनेक खासदार, मौनी खासदार म्हणून संसदेत ओळखले जातात. पण ते दरवेळी निवडून येतात. मतदार संघातील प्रश्‍नांची त्यांना जाण नसते पण मतदार कसे मत देतील याचाच त्यांचा अभ्यास असतो. यामुळेच सध्या देशाचा विकास खुंटला आहे. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. नुसती मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यास कशाचा करायचा हे देखील महत्त्वाचे आहे. परीक्षेत मार्क कसे पडतील याचेच नियोजन करून तसा अभ्यास केला जातो. यामुळे सध्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थ्यी गुणवत्ता यादीत पाहायला मिळतात. पण संशोधनात्मक वृत्ती त्यांच्यात वाढीस लागायला हवी तरच त्या गुणवत्तेचा खरा फायदा होईल. राजकारण्यांनी फक्त मतांचा अभ्यास न करता विकासात आडकाठी ठरलेल्या प्रश्‍नांचा अभ्यास करायला हवा. खरा मुरब्बी राजकारण्याला प्रश्‍न हाताळण्याची खरी जाण असते. विकास साधून मते मिळविणारेच खरे राजकारणात टिकून राहतात, हे विसरता कामा नये. अध्यात्मात साधनेतून ब्रह्मत्वाकडे जाता येते. पण यासाठी साधना कशी करायची याचा अभ्यास हवा.

No comments:

Post a Comment