Friday, August 14, 2020

अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा । ( एकतरी ओवी अनुभवावी)

 


अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा । ( एकतरी ओवी अनुभवावी)

गुरु - शिष्याची ही परंपरा खंडीत झाली आहे असे वाटत असले तरी ती विचाराने पुन्हा पुढे सुरु राहाते. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती आहे. ती टिकवण्यासाठी आपण कार्य करायला हवे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरुप होईल आपैसा ।
तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजो तरी ।। 43 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरुप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा. 

गुरु आणि शिष्याचे नाते कसे असते हे श्रीकृष्णाच्या विश्वरुपदर्शनातून स्पष्ट होते. शिष्यासाठी गुरु काय करतात.? त्याच्या प्रगतीसाठी गुरुंना काय काय करावे लागते? हे यातून सहजच स्पष्ट होते. शिष्याचा सर्वांगिन विकास हेच गुरुंचे ध्येय असते. सध्याच्या युगात असे गुरु फारच क्वचित पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्वकाळात असे गुरु होते. अशा गुरुंच्यामुळेच देशात स्वातंत्र्यांची चळवळ उभी राहू शकली हेही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्यानंतर तो विचार पुढे काही काळ देशात पाहायला मिळाला. पण सध्या असे गुरु फार क्वचितच पाहायला मिळत आहेत. 

स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. अशा शिक्षकांच्या त्यागामुळेच त्यांच्या शिष्यांनी मोठी मजल मारली. खेड्यापाड्यातून, वाडी वस्त्यातून, शहरातही असे त्यागी गुरू पाहायला मिळत. शिष्यानीही त्या गुरुंचे गोडवे गायीले. सांगण्याचा उद्देश हाच की गुरुंच्या त्यागातूनच शिष्य घडत असतो. सध्याच्या काळात असे गुरु फारच क्वचित पाहायला मिळतात. त्याला कारणेही तशी आहेत. त्या काळातील परिस्थिती तशी होती. त्यावेळेची ती गरजही होती. बदलत्या काळात गुरुंच्या समोरच अनेक अडचणी उभ्या आहेत. राजकारणही तितकेच महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षण संस्था राजकिय व्यक्तींच्या हातात आहेत. त्याचा वापर ते त्यांच्यासाठी करत आहेत. अशाने त्यागाची भावनाच नष्ट झाली आहे. त्यागीवृत्तीने काम करण्याची वृत्तीच लुप्त होताना पाहायला मिळत आहे. 

त्यागतरी कुणासाठी करायचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तसे शिष्यही असायला हवेत. तशा व्यक्तीही असायला हव्यात. शिष्यामध्येही तितकीच त्यागी वृत्ती असायला हवी. राजकिय व्यक्तींमध्येही त्या त्यागाची भावना असायला हवी. ते गुण असायला हवेत. बऱ्याचदा असे असतेही पण याकडे दुर्लक्ष केले गेल्याने सुद्धा मानसाच्या वृत्तीत बदल घडत आहेत. एकंदरीत विचार केला तर गुरु-शिष्याची ही जोडगोळी, ही परंपरा आता शिक्षण क्षेत्रात लुप्त होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या जीवनात त्याचा पहिला गुरु ही त्याची माता असते. मग ती जन्मदाती असो व नसो. जीवनात त्याचे पालनपोषन करणारी माता हीच त्या व्यक्तीची पहिली गुरु असते. 

मुलांस सांभाळणारी आई हीच प्रथम गुरु आहे. भगवान कृष्णांचा जन्म द्वारकेत झाला. देवकीच्या पोटी जन्म झाला. पण कृष्ण गोकुळात वाढला. यशोदने कृष्ण वाढवला. म्हणजे जन्माने जरी मात नसली तरी प्रेमाने यशोदा ही त्यांची माता होती. देवाच्या बाबत, राजाच्या बाबत हे घडते. मग सर्व सामान्यांच्या जीवनातही तेच आहे. प्रेमाने, त्यागाने वाढवणारी माताच मुलाला मोठे करू शकते. हे गुरु-शिष्याचे नाते आहे. मातेचा त्याग हा मोलाचा असतो. आई मुलासाठी काय करु शकते ? गुरु - शिष्यासाठी काय करु शकतो ? मुलाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न माता करत असते. 

शिष्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला सामर्थ्यवान करण्यासाठी गुरु झटत असतात. भगवान कृष्णांनी अर्जुनाला गीता ही याचसाठी सांगितली आहे. शिष्याला जागृत करण्यासाठी त्यांनी विश्वरुप दर्शनही घडवले. अगदी सहजपणे त्यांनी शिष्याला भानावर आणत त्याचे कार्य काय आहे हे समजावून सांगितले. हतबल झालेल्या शिष्याला सामर्थ्य देण्याचे काम गुरूचे आहे. गुरु - शिष्याची ही परंपरा खंडीत झाली आहे असे वाटत असले तरी ती विचाराने पुन्हा पुढे सुरु राहाते. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृती आहे. ती टिकवण्यासाठी आपण कार्य करायला हवे. 

लेेेखन - राजेेंद्र कृष्णराव घोरपडे

.....

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन, यांसह आता शेती, घडामोडी, संशोधन, राजकारण, स्पर्धा परीक्षा असं विविध वाचण्यासाठी आमच्या चॅनलला जॉईन व्हा.

https://t.me/IyeMarathichiyeNagari

या लिंक वर क्लिक करून

No comments:

Post a Comment