Tuesday, December 31, 2019

तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।


सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.

आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।। 969 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरुपांतील कलेचा कमीपणा ठेवीत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते.

गुरुकृपा म्हणजे काय? ती कशी होते? याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. मला एक गृहस्थ म्हणाला, गुरुकृपेने मला सगळे मिळाले. गुरूंचा शब्द मी पाळला आणि अमाप पैसा मिळाला. माझा अध्यात्मावर विश्‍वासही नव्हता. तसे या युगात अध्यात्मावर विश्‍वास तरी कोण ठेवणार? पण मला गुरुकृपेचा अनुभव आला. गुरूंच्या शब्दाला महत्त्व असते. मला दैनंदिन जीवनात अनेक कटकटी वाटत होत्या. घरगुती समस्यांनी मी त्रस्त झालो होतो. समस्यांच्या गर्तेत अडकल्यानंतरच जनतेला देव आठवतो, तसा मलाही देव आठवला. देवळात जायला लागलो. तेथे नेहमी प्रवचन चालायचे. प्रवचनकार सांगत होते, माऊलीने संसार करत परमार्थ करा, असे सांगितले आहे. संसार सोडण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता. यासाठीच मी संन्यस्थाचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत होतो, पण येथे तर उलटेच सांगितले जात आहे. संसार न सोडता परमार्थ करा, असे सांगितले जाते. हे कसे शक्‍य आहे? मी विचार केला, ठीक आहे. हा ज्ञानेश्‍वरांचा आदेश, गुरूंचा आदेश असे समजून प्रयत्न तरी करून पाहू. संसार होत राहतो. परमार्थ करावा लागतो. संसारात राहायचे, पण त्यात गुरफटायचे नाही. काय हरकत आहे असे करून पाहायला, असे समजून प्रयत्न सुरू ठेवले. घरगुती समस्यांपासून दूर राहिलो. रोजच्या कटकटींचा विचारच सोडून दिला. त्यामुळे झाले काय, संसार सुरू होता, पण त्या संसाराचा त्रास होत नव्हता. कामावर, व्यवसायावर या कटकटींचा परिणाम होत नव्हता. घरच्या नेहमीच्या कटकटी त्याच असतात. त्याकडे कानाडोळा केला. संसार होतच राहिला, पण त्या कटकटींपासून दूर राहिलो. विकास झाला. हातात अमाप पैसा खेळू लागला. आपोआपच संसारात शांती नांदू लागली, पण परमार्थांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. मोक्ष म्हणजे काय हेही माहीत नाही, पण तरीही संसारात शांती नांदते, याचे समाधान आहे. गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे, असे वाटते. ही गुरूकृपाच आहे. सांगण्याचे ताप्तर्य हेच की, सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


No comments:

Post a Comment