Wednesday, December 18, 2019

राजेशाही





लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत, पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे.

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडंव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राति होऊनी ।। 724 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - आणि राजा ज्या वाटेनें जातो ती वाट चोराला अडचणीचें ठिकाण होते. अथवा राक्षसांना दिवस उजाडला असतां ती रात्र आहे, असें वाटतें.

सध्या लोकशाही आहे. राजेशाही पूर्वी होती. राजेशाहीत राजा तसे लोकशाहीत लोकप्रतिनिधी आहेत. राजेशाहीत भ्रष्टाचारी राजाचे शासन जनता उलथून पाडत असे. जनतेने राजाच्या विरोधात विद्रोह केल्याच्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. लोकशाहीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याचा अधिकार जनतेला दिला आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी हे आजचे सरदार व मंत्री आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नसावी; पण विचार केला तर राजेशाहीत जनता जितकी सुखी होती तितकी लोकशाहीत निश्‍चितच नाही. लोकशाहीची गरज आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. सर्वांचा विचार यामध्ये आहे, पण लोकप्रतिनिधींनी सामर्थ्यवान राजाच्या गुणांचा, आदर्शांचा वारसा जपायला हवा. केवळ सत्ता आली की ऐश्‍वर्य, स्वतःचे घर भरायचे. उलट राजेशाहीत राजांनी काय केले? त्यांनी सत्तेचा भोग घेतला, स्वतःचे राजवाडे भरले, असे सांगून त्यांचाच हा आदर्श आहे हे पटवून देण्यातही हे लोकप्रतिनिधी मागे नाहीत; पण प्रत्यक्षात राजेशाहीचा अर्थ तसा नाही. सामर्थ्यवान राजाचा प्रभाव काय होता, हे ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीतच सांगितले आहे. राजाची दहशत काय असते, हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते, इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती. मग सध्याच्या लोकप्रतिनिधींची अशी दहशत आहे का? ती का नाही? उलट लोकप्रतिनिधीच चोरांना सोडवायला पोलिस ठाण्यात दाखल होतात, असे आजचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या सभेतच चोरीच्या अनेक घटना घडतात. लोकप्रतिनिधींच्या वाटेवर जायला आजची जनताच घाबरते आहे. यामुळेच सभेला पैसे देऊन जनता गोळा करावी लागते. चोरावर धाक असणाऱ्या राजाचा रुबाब काय असेल, याची कल्पनाही या लोकप्रतिनिधींना करवत नाही. लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत, पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे. अशा श्रेष्ठ राजांचा आदर्श हा जपायलाच हवा. त्यांचे गुण हे अंगी बाणवायलाच हवेत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment